पंढरपूरचे चंद्रभागानदी वाळवंट स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न. ◾स्वच्छता अभियानातून 18 टन कचरा संकलित. ◾अभियानात विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक संस्था व न.पा कर्मचाऱ्यांचा सहभाग.

पंढरपूरचे चंद्रभागानदी वाळवंट स्वच्छता अभियान  उत्साहात संपन्न.  ◾स्वच्छता अभियानातून 18 टन कचरा संकलित.  ◾अभियानात विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक संस्था व न.पा कर्मचाऱ्यांचा सहभाग.


---------------------------------------------------------------------------
पंढरपूर, (दै.पंढरी नगरी न्यूज):-  पंढरपूर शहरातील चंद्रभागा वाळवंट परिसर स्वच्छ, सुंदर व निर्मळ ठेवण्याच्या उद्देशाने पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर यांच्या पुढाकाराने आज चंद्रभागा वाळवंट परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानास विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्थांनी  उत्स्फूर्तपणे संख्येने सहभाग नोंदविला. या स्वच्छता अभियानातून तब्बल 18 टन कचरा संकलित करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

   सदर स्वच्छता अभियान पंढरपूर नगरपरिषद, जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्था, श्री विठ्ठल गुरुकुल शिक्षण संस्था, पंढरपूर इस्कॉन तसेच विठ्ठल रुक्मिणी सुखाचे जीवन, रेंदाळ (ता. हातकणंगले) यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित करण्यात आले होते.या अभियानात संबंधित संस्थांचे पदाधिकारी व स्वयंसेवक, पंढरपूर नगरपरिषदेचे विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच पदाधिकारी व   नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.


चंद्रभागा वाळवंट परिसरात राबविण्यात आलेल्या या विशेष स्वच्छता अभियानामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा संकलित करण्यात आला. अभियानादरम्यान 18 टन कचरा संकलित करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. स्वयंसेवक, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांनी श्रमदानातून परिसरातील कचरा, प्लास्टिक व इतर घनकचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला.यावेळी अभियानाच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त परिसर आणि पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

‘स्वच्छता हीच विठ्ठल सेवा’चा संदेश

पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात येत असतात. चंद्रभागा नदी व वाळवंट परिसराला धार्मिक तसेच सांस्कृतिक महत्त्व असल्याने हा परिसर स्वच्छ व निर्मळ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची आणि भाविकांची सामूहिक जबाबदारी आहे.यावेळी “स्वच्छता हीच विठ्ठल सेवा”, “श्रमदानातून भक्ती” आणि “सहभागातून स्वच्छता” या संदेशांच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.

दर बुधवारी श्रमदान अभियान

पंढरपूर शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ करण्याच्या उद्देशाने पंढरपूर नगरपरिषदेमार्फत दर बुधवारी सकाळी ७.३० वाजता स्वच्छता व श्रमदान अभियान आयोजित करण्यात येणार आहे.

या अभियानात शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था , शैक्षणिक संस्था, विविध मंडळे आणि इतर इच्छुक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून आपल्या संस्थेची नोंदणी करावी . नोंदणीसाठी उपमुख्याधिकारी रवींद्र सूर्यवंशी (भ्रमणध्वनी क्रमांक ८६६८८१४३६५)यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. 

पंढरपूर शहर स्वच्छ, सुंदर, निरोगी व निर्मळ ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून ‘स्वच्छ पंढरपूर – सुंदर पंढरपूर’ या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहनही  यावेळी मुख्याधिकारी  महेश रोकडे यांनी केले.