पंढरपूरात नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाचे मॉकड्रिल. ◾आपत्कालीन परिस्थितीत शीघ्रकृती दल तैनात. ◾उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क.
---------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज):पंढरपूरात आगामी शारदीय नवरात्रौत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावा तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवी यासाठी पंढरपूर शहर पोलीस दल पूर्णपणे सतर्क झाले असून, कोणत्याही आपत्कालीन किंवा अनुचित प्रसंगी पोलीस दल घटनास्थळी वेळेत आणि कसे पोहोचते याची चाचपणी करण्यासाठी आज बुधवारी दि.७श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर परिसरात मॉकड्रिल राबविण्यात आले.
नवरात्रौत्सवात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यावर वेळीच नियंत्रण कसे मिळवायचे याबाबत पंढरपूर शहर पोलीस दलाकडून मॉकड्रिल करण्यात आले. यावेळी चित्त थरारक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून रंगीत तालीम करण्यात आली. उत्सवाच्या काळात अनेकदा जमावाची परिस्थिती उद्भवते ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना कुठल्या परिस्थितीत कशा प्रकारची पावले उचलावयाची याबाबत शहर पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर परिसर येथे मॉकड्रिल केली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक सावजी, दत्तात्रय लेंडवे यांच्यासह १३ पोलीस ठाणे अंमलदार, शीघ्र कृती दलाचे १० जवान, दंगा काबु पथकाचे १६ जवान, बॉम्बशोधक व नाश पथकाचे १० जवान तर वाहतूक शाखेचे ०६ पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.