मोहिते पाटलांनी माढ्यात वाढवली शिंदेंची धाकधूक.... यामुळे सोलापूर जिल्ह्याचे राजकीय चित्र बदलणार

मोहिते पाटलांनी माढ्यात वाढवली शिंदेंची धाकधूक.... यामुळे सोलापूर जिल्ह्याचे राजकीय चित्र बदलणार

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) पवारांच्या बालेकिल्ल्यांपैकी एक असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघ भाजपने गेल्या वेळी मोहिते- पाटील यांच्या साहाय्याने प्रथमच ताब्यात घेतला. मात्र, या वेळी तोच माढा मोहिते- पाटील यांच्यामुळे गमवावा लागला.भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पराभवाने भल्याभल्यांची झोप उडाली आहे. अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या माढ्यातून मोहिते- पाटील यांना अपेक्षापेक्षा जास्त मताधिक्य मिळाले आहे. शिंदे बंधू आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे माढ्यात मोहिते पाटलांची वाट रोखून धरतील, असे वाटत असतानाच माढ्यातून मोहिते पाटलांनी घेतलेल्या मताधिक्क्यामुळे शिंदेंची अडचण वाढली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील हे तब्बल एक लाख २० हजार ८३७ मतांनी निवडून आले आहेत. त्यांना सहा लाख २२ हजार २१३ मते मिळाली आहेत, त्यांचे प्रतिस्पर्धी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ५ लाख ०१ हजार ३७६ मते मिळाली आहेत. यात माळशिरसनंतर माढ्यातून सर्वाधिक मताधिक्कय मोहिते पाटील यांनी मिळविले आहे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार बबनराव शिंदे यांच्यासाठी विचार करायला लावणारे आहे.मोहिते पाटील आणि माढ्याचे शिंदे यांच्यात राजकीय वर्चस्वाचा वाद सर्वश्रूत आहे. त्याच वादाला कंटाळून मोहिते पाटील यांनी शरद पवारांची साथ मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोडली होती. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा परिषदेपासून जिल्हा बॅंकेपर्यंत सर्व ठिकाणी या दोन्ही गटात वाद असायचा. त्यामुळे या निवडणुकीत माढ्यात काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. विशेष म्हणजे माढ्यातील कट्टर राजकीय विरोधक असलेले सावंत आणि शिंदे कुटुंबीय प्रथमच एकत्र आले होते. त्यामुळे निंबाळकरांना किती मताधिक्क्य मिळते, अशी चर्चा होती.

देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मागील विधानसभा निवडणुकीत बबनराव शिंदे आणि शिवसेनेच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांएवढी मते निंबाळकर यांना देण्याचा शब्द दिला होता. मागील विधानसभा निवडणुकीत बबनराव शिंदे यांना एक लाख 42 हजार 573, तर शिवसेनेचे उमेदवार संजय कोकाटे यांना 74 हजार 328 मते मिळाली होती. दोघांना दोन लाख 16 हजार 901 मते मिळतील. तेवढी मते देण्याचा शब्द सावंतांनी फडणवीसांना दिला होता. प्रत्यक्षात कोकाटे यांच्याइतकीही मते माढ्यातून निंबाळकरांना मिळू शकली नाहीत. याशिवाय बबनदादांनी दोन लाख मताधिक्क्यांनी निंबाळकर यांना निवडून आणू, असे म्हटले होते.

माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना एक लाख २२ हजार ५७०, तर निंबाळकरांना ७० हजार ०५५ मते मिळाली आहेत. म्हणजेच माढ्यातून तब्बल ५२ हजार ५१५ मतांचे लीड मोहिते पाटील यांना मिळाले आहे. त्यामुळे शिंदेंबरोबरच तानाजी सावंतांचीही अडचण झाली आहे. माढा हा आमदार बबनराव शिंदे यांचा मतदारसंघ आहे. माळशिरस तालुक्यातील १४ गावे आणि पंढरपूरमधील ४१ गावे माढ्याला जोडली आहेत. त्यामुळे मोहिते पाटलांना मिळालेले लीड विधानसभा निवडणुकीत बबनदादांना अडचणीचे ठरू शकते.

माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बबनराव शिंदे यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. स्वतः बबनदादा आरोग्याच्या कारणामुळे थांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, बबनदादा नसतील तर माढ्याची लढत राष्ट्रवादीसाठी अवघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता आहे. एखादं मोठं नाव आलं तर शिंदेंची अडचण वाढू शकते. त्यामुळे मोहिते पाटलांना माढ्यातून मिळालेले ५२ हजारांचे लीड विधानसभेला शिंदेंची डोकेदुखी ठरू शकते.