बार्शीच्या कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये प्राचार्य डॉ. चंद्रकांत मोरे अभिष्टचिंतन सोहळा संपन्न...

बार्शीच्या कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये प्राचार्य डॉ. चंद्रकांत मोरे अभिष्टचिंतन सोहळा संपन्न...

------------------------------------------------------------------------------------

बार्शी( दै. पंढरी नगरी न्यूज) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचालित कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी येथे प्राचार्य डॉ. चंद्रकांत मोरे यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त विशेष अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे जनरल सेक्रेटरी पी टी पाटील तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी वाय यादव होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे,सहसचिव ए पी देबडवार,कार्यकारिणी सदस्य व्ही एस पाटील, मसापचे अध्यक्ष पी एन निपाणीकर, प्राचार्य डॉ. एस एस गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस एस गोरे यांनी केले. यामध्ये त्यांनी प्राचार्य डॉ. चंद्रकांत मोरे यांच्या कारकिर्दीचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, प्राचार्य डॉ .चंद्रकांत मोरे हे एक उत्कृष्ट शिक्षक, संशोधन मार्गदर्शक, लेखक व प्रशासक म्हणून लोकप्रिय आहेत. संजय मोरे यांनी चंद्रकांत मोरे चॅरिटेबल ट्रस्टचा अहवाल सादर केला. संस्थेच्या व विविध मान्यवरांच्या शुभहस्ते प्राचार्य डॉ. चंद्रकांत मोरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. चंद्रकांत मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, १९६६ पासून बार्शीच्या कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये प्राध्यापक म्हणून सेवेला सुरुवात केली. कर्मवीर मामांच्या सहवासाने जीवनाचे सोने झाले. कर्मवीर मामांच्या विविध संकल्पना साकारण्यासाठी जेष्ठ कार्यकर्त्याबरोबर योगदान दिले. मामांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या वचनाप्रमाणे कामात राम आहे या उक्तीप्रमाणे कार्य करीत राहिलो. आपणाला मिळणाऱ्या वेतनावर समाजाचाही हक्क आहे जाणीव ठेवून वंचित व गरजू लोकांना मदत केली. राष्ट्रसेवा दलाच्या संस्कारानुसार समाजसेवा करण्याचा संकल्प केला. वाढदिवसानिमित्ताने मसाप शाखा बार्शीला विविध उपक्रम राबविण्यासाठी रोख एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. संस्थेच्या "माझा वाढदिवस- माझी संस्था" या उपक्रमासाठी रुपये दहा हजारचा धनादेश संस्थापदाधिकाऱ्याकडे सुपूर्द केला. या निमित्ताने प्राचार्य डॉ. चंद्रकांत मोरे यांनी कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शीच्या ग्रंथालयास एकूण ४०० पुस्तके व १०० दुर्मिळ मासिके भेट दिली. 

पी. एन निपाणीकर यांनी मसाप शाखा बार्शी अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केले. सरांनी ज्या हेतूने रुपये एक लाखाचा निधी दिला आहे तो त्याच कार्यासाठी वापरला जाईल असे आश्वासन दिले.

संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे यांनी प्राचार्य डॉ चंद्रकांत मोरे हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे असे सांगितले. ते साने गुरुजींच्या विचाराने भारावलेले व राष्ट्रसेवादलाचे सच्चे कार्यकर्ते आहेत असे गौरवोद्गार काढले.

कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांनी जुन्या काळातील एक उत्कृष्ट समाजशिक्षक व प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून प्राचार्य डॉ चंद्रकांत मोरे यांच्या उल्लेख केला. पुस्तक हीच शिक्षणाची संपत्ती व वैभव आहे. याचं दान आपल्या या महाविद्यालयात केले त्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले.

प्रमुख पाहुणे पी. टी पाटील यांनी कर्मवीर मामावर निष्ठा असणारा, त्यांचा शब्द प्रमाण मानणारा व त्यांच्या आदेशाचे पालन करणारे सच्चे कार्यकर्ते म्हणून चंद्रकांत मोरे सर यांचे उल्लेख केला जातो असे सांगितले. मामांचे शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय कार्य प्रकाशझोतात आणण्याचे कार्य प्राचार्य डॉ. चंद्रकांत मोरे यांनी केले आहे. एक चिंतनशील शिक्षक, तरुणांना लाजवेल अशी इच्छाशक्ती, उत्तम प्रशासक व मार्गदर्शक म्हणून सर आम्हाला नेहमी प्रेरणा देतात असे त्यांनी सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी वाय यादव यांनी प्राचार्य डॉ चंद्रकांत मोरे हे सानेगुरुजीवर अपार श्रद्धा असणारे व्यक्तिमत्त्व आहेत. संस्थेच्या कार्यात झोकून देऊन काम करणारा एक सच्चा कार्यकर्ता आहेत.अनेक गुणवत्तापूर्ण उपक्रम त्यांनी संस्थेत सुरू केले. संस्थेत समर्पित भावनेने काम केले. विद्यार्थी प्रिय शिक्षक ही सरांची ओळख आहे. त्यामुळे सरांचा मला व संस्थेला अभिमान आहे असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी उपस्थितांचे आभार डॉ. व्ही पी शिखरे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी ए पाटील , डॉ . एल आय राठोड यांनी केले. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. चंद्रकांत मोरे यांच्या परिवारातील सर्व सदस्य व नातेवाईक तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.