सिद्धेश्वर' बचाव, बोरामणी विमानतळासाठी सोमवारी मोर्चा
---------------------------------------------------------------------------------
सोलापूर( दै.पंढरी नगरी न्यूज) : राज्य सरकारने बोरामणी येथे मंजूर केलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरात लवकर सुरू करावे, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला कोणताही धक्का न लावता होटगी रोड विमानतळावरून तूर्त विमानसेवा एका बाजूने सुरू करावी या मागणीसाठी सोमवारी (ता.१९) सकाळी ११ वाजता सिद्धेश्वर साखर कारखान्यापासून होम मैदानापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.
बोरामणी विमानतळ सुरू करण्याच्या मागणीसाठी आणि 'सिद्घेश्वर सहकारी साखर कारखाना बचाव' यासाठी कृती समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या माध्यमातून हा मोर्चा निघणार आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्यापासून मोर्चाला सुरुवात होऊन हत्तुरे वस्ती, मजरेवाडी, आसरा, महावीर चौक, सात रस्ता, रंगभवन मार्गे तो होम मैदानावर पोहोचेल. त्या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत होईल.
या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी, भाकपचे नेते अॅड. रामचंद्र म्हेत्रस, शेतकरी संघटनेचे नेते शिवानंद दरेकर, अख्तरताज पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, सिद्धेश्वर साखर कामगार युनियनचे सरचिटणीस अशोक बिराजदार, बोरामणी विमानतळ कृती समितीचे अध्यक्ष प्रा. राजू चव्हाण, शेतकरी सभासद अंकुश आवताडे, अमोल हिप्परगी, राष्ट्रवादीचे दिनेश शिंदे, दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे आदींनी केले आहे.कामगार, शेतकऱ्यांचे उपोषण
बोरामणी विमानतळ तत्काळ विकसित करून विमानसेवा सुरू करण्यात यावी, सिद्धेश्वर साखर कारखान्याला प्रशासनाने दिलेल्या सर्व नोटिसा मागे घ्याव्यात, या मागणीसाठी गेल्या १९ दिवसांपासून सिद्धेश्वर साखर कामगार युनियनतर्फे कारखाना कार्यस्थळावर आणि शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ दिवसांपासून चक्री उपोषण सुरू आहे. अद्यापही आंदोलन सुरूच आहे.