डॉ .बाबासाहेब आंबेडकर चिरंजीव व्यक्तिमत्व होते :-- जयकुमार शितोळे यांचे मत, ◼️ बार्शीच्या कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात डॉ.आंबेडकर यांची जयंती साजरी...
------------------------------------------------------------------------------------
बार्शी (दै.पंढरी नगरी न्यूज) : "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे चिरंजीव व्यक्तिमत्व आहेत,"असे स्पष्ट विचार जयकुमार शितोळे यांनी व्यक्त केले. येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त ग्रंथपाल अशोक गवळी सर, गायक सुनिल फल्ले, समाजसेवक बप्पा सुतार, ग्रंथालयाचे उपाध्यक्ष धैर्यशील देशमुख हे उपस्थित होते.
प्रथमत: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले. पुढे बोलताना शितोळे म्हणाले,"व्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह, मानवतेची प्रतिष्ठा आणि सामाजिक गुलामगिरीचा निषेध ही बाबासाहेबांची विचारप्रणाली होती.त्यांना सदैव प्रेरणा देणारे गुरु भगवान बुद्ध, संतकवी कबीर, महात्मा फुले तर विद्या, विनय, शील ही त्यांची दैवते होती. स्वातंत्र्य, समता, बंधूता या तत्वांवर त्यांची अचल निष्ठा होती.शिका,संघटीत व्हा,संघर्ष करा हा त्यांचा दिव्य संदेश दिला.
समाजशास्त्र, शिक्षण, अर्थशास्त्र, तत्वज्ञान या विषयां बरोबरच महिला, कामगारांचे प्रश्न व शेती धोरण यामध्ये त्यांनी विशेष योगदान दिले. ते श्रेष्ठ कायदेपंडित, लोकशाही मूल्यांसाठी लढणारे नेते व भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांची स्मृती चिरंतन राहणार आहे असे विचार त्यांनी व्यक्त केले." या औचित्याने अशोक गवळी सर, बप्पा सुतार यांनी आपले यथोचित मनोगत व्यक्त करीत जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.यावेळी गायक सुनिल फल्ले यांनी आपल्या सुंदर आवाजात "उगवली सोनियाची सकाळ,जन्मास आले भीम बाळ" हे गीत सादर करीत बाबासाहेबांना अनोखे अभिवादन केले.
कार्यक्रमासाठी इसाक मुकेरी,विलास नेटके,नितीन गव्हाणे,प्रेम लोंढे आदी उपस्थित होते.यावेळी प्रतिमेच्या शेजारी भारतीय संविधान व डॉ.बाबासाहेबांचे चरित्र ग्रंथ माहितीसाठी ठेवण्यात आले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी व्यक्त केले तर आभार हनुमंत तुपे यांनी मानले.सदर कार्यक्रमासाठी सभासद व वाचक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.