संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील शेतातच मराठा आंदोलन आमरण उपोषणाला सुरुवात ◼️ संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातून वाढता प्रतिसाद , ◼️ मराठा बांधवाचे पाठिंबा देण्यासाठी जथेच्या जथे अंतरवाली सराटीकडे मार्गस्थ ◼️ पंढरपुरात मराठा आंदोलनाच्या उपोषण समर्थनार्थ गणेश( महाराज) जाधव यांचे उपोषण
------------------------------------------------------------------------------------
अंतरवाली सराटी (दै.पंढरी नगरी न्यूज) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत थेट अंतरवाली सराटी येथील शेतामध्ये भर उन्हात आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. सरकारकडून झालेली कालची शिष्टाई निष्फळ ठरल्यानंतर आज शनिवार, 30 मेपासून आंदोलनाला प्रत्यक्ष सुरुवात झाली.

सरकारच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने जरांगे पाटील यांनी कठोर भूमिका घेतली. “आता कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही,” असा निर्धार त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हैदराबाद गॅझेटमधील कुणबी नोंदींना प्रमाणपत्र द्यावे, सातारा गॅझेट मंजूर करावे तसेच मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव अंतरवाली सराटीकडे रवाना होत असून वातावरण तापू लागले आहे. काही ठिकाणी आंदोलकांकडून रस्ते रोकोची सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारकडून पुन्हा एकदा मध्यस्थीचा प्रयत्न सुरू असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहे. दुसरीकडे आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे.