सिद्धेवाडी ते तावशी रस्त्याची प्रचंड दुरावस्था..!

सिद्धेवाडी ते तावशी रस्त्याची प्रचंड दुरावस्था..!

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्युज ) : सिद्धेवाडी ते तावशी या मार्गावर अनेक ठिकाणी उघडी खडी, मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे या मार्गावरून हे जा करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेल्या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाची वर्षानुवर्षे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिक व वाहनधारकांमधून तीव्र समता व्यक्त होत आहे.

सिद्धेवाडी, चिचुंबे, तावशी  या  मार्गावरून खर्डी, तनाळी, शेटफळ, कासेगाव, एकलासपूर, मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर इत्यादी ठिकाणाचे  हजारो प्रवासी, शेतकरी ,विद्यार्थी नोकरदार महिला व वाहनधारक दररोज मोठ्या संख्येने ये- जा करीत असतात, या रस्त्यावरून खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखान्याच्या  ऊसतोडणी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते हा रस्ता रुंद असल्यामुळे प्रवास करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. परंतु खड्डेमय रस्त्यामुळे मनस्ताप सहन करत मार्गस्थ होण्याशिवाय गत्यंत नसल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावर लहान मोठ्या अपघाताच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत .या मार्गावर काही ठिकाणी खडी उघडी पडली आहे. काही ठिकाणी धुळीचे साम्राज्य निर्माण झाला आहे. दुचाकी व इतर वाहने जोरजोराने खड्ड्यात आढळून नादुरुस्त होत आहेत यामुळे मानसिक शारीरिक व आर्थिक अशा तिहेरी त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात येते.

सिद्धेवाडी ते खर्डी हा मान नदी शेजारील पंढरपूर - मंगळवेढा मतदार संघातील दोन्ही तालुक्यातील नागरिकांना सोयीस्कर असा मार्ग आहे .सांगोला व पंढरपूर या मार्गाला जोडत आहे. तावशी ते सिद्धेवाडी हा रस्ता सध्या खूप खराब आणि नादुरुस्त झाला आहे. याबाबत ग्रामस्थ विविध सामाजिक संघटना आणि वेळोवेळी प्रशासन लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला आहे, रस्ता रोको आंदोलन केले आहे मात्र अधिकाऱ्याकडून थातूर मातुर पद्धतीने उत्तरे दिली जात असल्याची माहिती वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव यांनी सांगितले. तरी तावशी ते सिद्धेवाडी या डांबरीकरण रस्त्याचे काम  संबंधित विभागाने त्वरित करण्यात यावे व नागरिक व वाहन चालकांना होणारा त्रास कमी करण्यात यावा अशी मागणी होत आहे.