ग्रंथोत्सव सोलापूर जिल्ह्यासोबत शिवरायांचे कौटुंबिक संबंध इतिहास संशोधक सतीश कदम
------------------------------------------------------------------------------------
सोलापूर ( पंढरी नगरी न्यूज ) छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य कर्तृत्व सर्व जगाला ज्ञात असले तरी सोलापूर जिल्ह्यातील पानगाव, वैराग, धामणगाव, उपळे दुमाला, जिंती, अक्कलकोट यासारख्या गावांचा बारकाईने अभ्यास केल्यास छत्रपती शिवराय आणि सोलापूर जिल्ह्याचे कौटुंबिक संबंध होते, ही सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट असल्याचे मत अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे मा. अध्यक्ष प्रा. डॉ. सतीश कदम यांनी व्यक्त केले आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि दयानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोलापूरात ग्रंथोत्सव 2023 या कार्यक्रमात ते बोलत होते. सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य चंद्रहंस गंभीर सर तर प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजय पवार , ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील उपस्थित होते.

पुढे बोलताना कदम म्हणाले की, आंध्र, तेलंगणा, तामिळनाडूपासून ते दिल्ली, उत्तर प्रदेश पर्यंत शिवरायांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या पराक्रमाची चुणूख दाखवून दिली होती, याचे अनेक दाखले लिखित स्वरूपात उपलब्ध असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि सोलापूर जिल्हा यांचे वेगळे नाते आहे. जिंती तालुका करमाळा हे शिवरायांच्या भोसले कुळाची मूळ जहागीर. पुढे शिवरायांनी आपले थोरले भाऊ संभाजीराजांना जिंतीची जहागीर दिली होती. त्यांचे वंशज आजही त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. बार्शी तालुक्यातील पानगाव या ठिकाणी ताराबाईची नात दर्याबाई साहेब यांचा विवाह झाला होता. वैरागच्या नाईक निंबाळकर घराण्यातील दोन मुलींचा विवाह करवीर छत्रपतींसोबत झाला होता. शिवकालीन संतांमध्ये धामणगावच्या संत बोधले बाबांचे नाव येते. अक्कलकोटची जहागीर म्हणजे छत्रपती शाहू राजांचे मानसपुत्र पत्तेसिंग भोसले होते. बार्शी तालुक्यातील रामनाथाचे उपळे हे गाव अष्टप्रधान मंडळातील रामचंद्रपंत अमात्य यांच्या कन्येला चोळी बांगडी करता दान दिलेले होते. अशा अनेक घटनांचा वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास केल्यास शिवचरित्र अभ्यासकास निश्चितच फायद्याचे ठरेल व यावर एक वेगळा ग्रंथ होऊ शकतो अशा प्रकारचे मत प्राध्यापक कदम यांनी व्यक्त केले. यावेळी छत्रपती शिवरायांचे जीवन चरित्र आणि राज्याभिषेक सोहळा यावर आपल्या संशोधन शैलीतून त्यांनी वेगळ्या पद्धतीने शिवचरित्राची संशोधनात्मक मांडणी केली. संदर्भावर आधारित व्याख्यान असल्याने विद्यार्थी आणि श्रोते यांना वेगळ्या दृष्टिकोनातून शिवचरित्राचे आकलन होण्यास मदत झाली, अशा प्रकारची प्रतिक्रिया प्रेक्षकामधून व्यक्त होताना दिसून आली. ग्रंथोत्सव कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयातील ग्रंथपाल, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन प्राध्यापक प्रवीण देशमुख यांनी केले तर आभार प्रदीप गाडे यांनी मानले.