संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या हजारो लाभार्थ्यांचे अनुदान ४ महिन्यांपासून रखडले, तांत्रिक त्रुटींमुळे निर्माण झाली समस्या ◼️ पंढरपूर तहसील सं. गा. यो. कार्यालयाकडून लाभार्थ्यांचे कामकाज जलद गतीने सुरू, ◼️राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील लाभार्थ्यांना शासनाने त्वरित अनुदान देण्याची मागणी...
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर ( दै. पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा आणि दिव्यांग निवृत्तीवेतन योजनांच्या लाभार्थ्यांना गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अनुदान मिळण्यास अडचणी येत आहेत.डिसेंबर २०२४ पासून या योजनांचे अनुदान डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
मात्र, आधारकार्ड अपडेट नसणे, बँक खात्याशी मोबाइल क्रमांक जोडला नसणे, तसेच तांत्रिक त्रुटींमुळे हजारो लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू असून, तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनीही सहकार्य केले आहे.
अनुदानातील अडचणींची कारणे,
या योजनांच्या अनुदान वितरणात येणाऱ्या अडचणींचे प्रमुख कारण म्हणजे तांत्रिक त्रुटी. लाभार्थ्यांचे आधारकार्ड बायोमेट्रिक अपडेट नसणे, आधार कार्डाशी मोबाइल क्रमांक लिंक नसणे, बँक खात्याशी आधार आणि मोबाइल क्रमांक जोडले नसणे, तसेच आधार आणि बँक खात्याशी वेगवेगळे मोबाइल क्रमांक जोडले गेल्याने अनुदान थेट खात्यात जमा होत नाही.
पंढरपूर तालुक्यातील हजारो लाभार्थ्यांना या समस्यांचा सामना करावा लागत आहे. पंढरपूर शहर व तालुक्यातून प्रत्येक गावातून येणाऱ्या लाभार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट आणि बँक खात्याशी सिडिंग करण्यासाठी संजय गांधी निराधार प्रणित, सोलापूर श्रावणबाळसेवा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी जाधव त्यांचे कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला आहे. या तांत्रिक त्रुटींमुळे अनेक लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे अनुदान वेळेवर मिळत नाही, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.
तहसील कार्यालयाचे सहकार्य,
सिद्धेवाडी ,शिरगाव ,चिचुंबे ,बोहाळी ,उंबरगाव ,पट .करोली, पिराची कुरोली , उंबरे (पा.) लक्ष्मी टाकळी तरटगाव कासे., नेपतगाव येथील लाभार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संजय गांधी निराधार प्रणित ,सोलापूर श्रावणबाळ सेवा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली गावातील लाभार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करून ते बँक खात्याशी सिडिंग करण्याचे काम जलद गतीने सुरू आहे. या लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी सोबत घेऊन जाण्यात आले. तहसीलदार सचिन लगुंटे, निवासी नायब तहसिलदार बालाजी पुदलवाड , महसूल नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल सहाय्यक जगन्नाथ कुंभार ,महसूल सहाय्यक एम. बी. अंकुशे , अर्चना मागाडे यांच्या टीमने या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण सहकार्य केले. या सहकार्यामुळे लाभार्थ्यांचे अनुदान पुन्हा सुरू होण्यास मदत झाली आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी जाधव यांनी तहसील कार्यालयाच्या टीमचे आभार मानले असून, त्यांच्या सहकार्यामुळे अनेक लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
मदतीचे आवाहन :-
या समस्येच्या निराकरणासाठी स्थानिक पातळीवर सामाजिक कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. तानाजी जाधव यांनी तालुक्यातील सर्व गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी गावातील लाभार्थ्यांना आधार अपडेट, बँक खात्याशी सिडिंग आणि मोबाइल क्रमांक लिंक करण्यासाठी मदत करावी. यासाठी लाभार्थ्यांनी अपडेट केलेले आधारकार्ड, बँक खात्याची झेरॉक्स आणि लिंक केलेला मोबाइल क्रमांक तहसील कार्यालयातील संजय गांधी शाखेत जमा करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत स्थानिक पातळीवरील सहभागामुळे लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळण्यास मदत होईल.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे लाभार्थी अनुदान विना प्रलंबित
दारिद्र रेषेखालील एखाद्या कुटुंबातील करता पुरुष मयत झाल्यानंतर शासनाकडून वीस हजार रुपयांचे अनुदान मयताच्या पत्नी मुले यांना वारसांना दिले जाते. या योजनेतून लाभ घेण्यासाठी सध्या पंढरपूर तहसील कार्यालय संजय गांधी शाखेकडे तालुक्यातील या योजनेतून पाच लाभार्थ्यांनी अर्ज सादर केली आहेत परंतु शासनाकडे संजय गांधी योजनेच्या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी अनुदान नसल्याने पात्र लाभार्थ्यांचे अर्ज धूळ खात पडले असून ते अनुदान विना प्रलंबित असल्याची माहिती संबंधित संजय गांधी शाखेकडून देण्यात आली
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी संजय गांधी निराधार प्रणित श्रावणबाळ सेवा योजना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी जाधव यांनी केली आहे.