रात्रीस खेळ चाले.. अवैध वाळू उपशाने नदीपात्राची चाळण; पथक कशी करतात राखण? सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे हे याकडे लक्ष देतील का ?

रात्रीस खेळ चाले.. अवैध वाळू उपशाने नदीपात्राची चाळण; पथक कशी करतात राखण? सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे हे याकडे लक्ष देतील का ?

------------------------------------------------------------------------------------
वाळू तस्करांच्या गाडीवर कारवाईवरून रावसाहेब आणि वाळू तस्कर यांच्यात खडाजंगी झाल्याची पंढरपूरात चर्चा!

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील भीमा व मान नदीवरील अद्याप एकाही  वाळू डेपोचा  लिलाव झाला नाही. वाळूअभावी घरकुलांची कामे थंडबस्त्यात आहेत दिवसा कुठल्याच प्रकारची हालचाल न करणारे हे वाळू तस्कर रात्रीच्या काळोखात वाळू तस्करीचा हा खेळ मांडत असतात. कुणाचाही वचक नसल्याने नदीपात्रांची चाळण बिनदिक्कतपणे सुरू आहे. अर्थात याला महसूल आणि पोलिस प्रशासनाची मूक संमती आहेच. जिल्हा प्रशासन अवैध वाळू उपशावर कारवाईचा बडगा उगारण्याचा दावा करत असले तरी तो किती खोटा आहे, याचा आढावा पंढरी नगरी न्यूज या चमूने घेतला. याच दाव्याची पोलखोल करणारा हा ग्राऊंड रिपोर्ट.

नदीपात्र पोखरले -:तालुक्यात सरकोली येथील चंद्रभागा नदी पात्रातून तीन ठिकाणाहून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केला जात असल्याचे वास्तव चित्र आहे.

या परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा केली असता रात्रीतून हा खेळ चालत असल्याचा प्रकार त्यांनी सांगितला. रोजगार मिळतो म्हणून आजूबाजूच्या खेड्यातील मजूर वर्ग रात्रीला यारीच्या साहयाने चाळणी झालेली वाळू ट्रॅक्टरमध्ये भरून देण्याचा करार करतात. टिपर ,ट्रॅक्टरने ही वाळू मोहोळ, मंगळवेढा, सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागात विकली जात असल्याचे पुढे आले आहे.

रात्रीतून टिपर ,ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत असल्याने सरकोली ,आंबे  व तावशी असा ग्रामीण नदीपात्राला लागून असलेल्या गावातून हा तस्करीचा खेळ चालत असल्याचे वास्तव आहे.रात्रीतून सुद्धा विशेष पथक गस्तीवर नावालाच आहेत. वाळू माफिया व चोरट्यांना आळा घालण्यासाठी नियमानुसार कारवाई केली जात आहे.

◼️ भीमा काठावरून सर्वाधिक वाळूची चोरी

तालुक्यातील  काही ठिकाणी वाळू माफिया भरदिवसा वाळूचा उपसा करून रात्री ट्रॅक्टरमधून त्याची वाहतूक करतात. अवैधरित्या वाळू उत्खनन व वाहतुकीकरिता विना नंबरच्या वाहनांचा सर्रास वापर केला जातो. तसेच वाहतूक करताना महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या घरावर पाळत ठेवणारी वाळू माफियांची मोठी यंत्रणा आहे.

प्रशासन या अवैध वाळू उपशावर हेतू पुरस्पर कार्यवाही करीत नसल्याने मुजोर बनलेल्या वाळूमाफियाने चक्क तालुक्यातील पोलिसांवरच वाहन चालवण्याचा प्रयत्न केल्याची काही घटना घडत आहे.

तालुक्यातील एकाही डेपोचा  लिलाव नाही तरी वाळू तस्करी सुरू आहे .काही ठिकाणीपाणी असल्याने वाळू काढता येत नाही .वाळू डेपोचे लिलाव झाले नाही;परंतु वाळू तस्करांना मोकळं रान झालं.रात्रीच्या काळोखात वाळूची मोठ्या प्रमाणावर तस्करी करून ती ट्रॅक्टर, टिपरने नियोजित ठिकाणी पोहोचविली जाते.

यातील  काही गावातील बंधाऱ्यामुळे पाणी असल्यानं नदीपात्रातून वाळू काढणे शक्य होत नाही.  विशेष म्हणजे, रात्रीतून वाळू तस्करी होत असल्याची माहिती मिळत असून सुद्धा महसूल विभाग झोपेचे सोंग घेत आहे. पंढरपूर शहरातील एका संघटनेचा पदाधिकाऱ्याने माझ्याच वाहनावर कारवाई का? करता तुम्हाला दुसऱ्याची वाहने दिसत नाही का?असे खडे बोल सूनावले यावरून महसूल विभागाचा बडा अधिकारी व वाळू तस्कर यांच्यामध्ये कारवाई करण्यावरून मोठी खडा जंगी झाल्याची चर्चा काल तहसील कार्यालयासमोर कामानिमित्त आलेल्या नागरिकांमधून होत होती .संबंधित महसूल  अधिकाऱ्यांनी वादावादी नंतर भीमा नदीवरील खरसोळी व आंबे येथील अवैद्य वाळू उत्खनन बंद करण्याचे आपल्या खबर्यामार्फत आदेश दिल्यामुळे येथील वाळूची चोरी बंद झाली आहे.

पंढरपूर तालुक्यातील प्रमुख नद्यांना सध्या तस्करांनी आपले केंद्र बनविले असून कुठे दिवसाढवळ्या तर कुठे रात्री बेरात्री मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू चोरीच्या प्रकारामुळे नदी, नाले चाळणी झाले आहेत.

याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने सरकोली येथील नदीच्या पात्रात रविवारी नद्यांची प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेक ठिकाणी नदीपात्रातून वाळू उत्खनन होताना दिसून आले. प्रस्तुत प्रतिनिधीला दरम्यान नदीपात्रात उतरताना बघताच वाळू उपसा करणाऱ्यांनी आपले पावडे, घमेले व चाळणी जागेवर सोडून पळ काढला.

◼️ प्रशासन सुस्त, नदीचे पात्र फस्त.

पंढरपूर तालुक्यात भीमा नदी व मान नदीच्या पात्रात भरमसाठ साठा उपलब्ध असलेल्या वाळू भविष्यात वाळूचा कणही शिल्लक राहू नये,अशाप्रकारे नदीचे पात्र  ओरबडले जात आहेत.या अवैध उत्खननातून दैनंदिन शेकडो ब्रास वाळूची विल्हेवाट लावली जात आहे. सर्वसामान्यांच्या सहज निदर्शनास पडणारा हा गंभीर प्रकार महसूल व पोलिस प्रशासनाला दिसू नये याबाबत कमालीचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.तालुक्यातील सरकोली, मुंढेवाडी खरसोळी व आंबे येथील भीमा नदीच्या पात्रातून  राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे.त्यासाठी नदीपात्रात दहा पंधरा फुटांपर्यंत उत्खनन करण्यात आल्याने पर्यावरणाची पुरती वाट लावण्यात येत आहे.