मोहिते पाटलांच्या कारखान्याला निधी केंद्राचा; पण कार्यक्रमाला भाजपचा एकही नेता का नव्हता ?

------------------------------------------------------------------------------------
माळशिरस (पंढरी नगरी न्यूज ) केंद्र सरकारकडून 'एनसीडीसी'च्या माध्यमातून मंजूर झालेल्या ११३ कोटी रुपयांच्या निधीतून माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखाना प्रकल्पाच्या विस्तारित कामाचे भूमिपूजन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत झाले.भाजपच्या मदतीने सुरू झालेल्या या कारखान्याच्या कार्यक्रमासाठी मात्र सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील भाजपचा एकही नेता अथवा पदाधिकारी उपस्थित नव्हता.
केंद्र सरकारच्या पुढाकारातून राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून (एनसीडीसी) राज्यातील सहा सहकारी साखर कारखान्यांसाठी ५४९ कोटी ५४ लाख रुपये मार्जिन लोन मंजूर झाले. त्यात मोहिते पाटील यांच्या सदाशिवनगर येथील शंकर सहकारी साखर कारखान्याला ११३ कोटी ४२ रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीच्या माध्यमातून शंकर सहकारी साखर कारखान्याचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शंकर सहकारी साखर कारखाना प्रकल्पाच्या विस्तारित कामाचे भूमिपूजन रविवारी पार पडले. वास्तविक माळशिरसचे आमदार राम सातपुते आणि माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपचे आहेत. त्यात निंबाळकर यांच्याशी मोहिते पाटील यांचे तेवढसे सख्य नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या माध्यमातून मदत झाल्याने दोन वर्षांपूर्वी श्री शंकर सहकारी साखर काखान्याचा हंगाम सुरू झाला. त्यावेळी तो कारखाना काही आठवडे चालला. त्यानंतर कारखान्याची दुरुस्ती आणि विस्तारीकरण कामासाठी केंद्राच्या माध्यमातून ११३ कोटी रुपये मिळाले. त्या कामाचे भूमिपूजन रविवारी झाले. भाजपच्या मदतीमुळे शंकर सहकारी साखर कारखाना सुरू झाला. मात्र, त्याच कारखान्याच्या कार्यक्रमाला तालुक्यातील भाजपचा एकही नेता अथवा पदाधिकारी उपस्थित नव्हता.