विठुरायाला फराळाचे ऐवजी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवल्या प्रकरणी मंदिर समिती पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, ◼️ चैत्र एकादशीला विठुरायाला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा पूर्वीपासूनच चालत आलेली आहे यामध्ये कोणताही नवीन बदल केलेला नाही : , मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर येथील विठुरायाला चैत्र एकादशीच्या दिवशी अर्पण करण्यात आलेल्या पुरणपोळी नैवेद्यावरून नव्या वाद निर्माण शक्यता नाकारता येत नाही . एकीकडे ही परंपरा असल्याचे मंदिर समितीचे म्हणणे असताना, वारकरी साहित्य परिषदेने या प्रथेवर कडाडून आक्षेप घेतला आहे.त्यामुळे धार्मिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
पंढरपूरात चैत्र एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी भाविक उपवास करून विठुरायाचे दर्शन घेतात. या दिवशी विठुरायाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आल्याने वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील महाराज यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, एकादशीच्या दिवशी उपवासाचे विशेष महत्त्व असते. विठ्ठलाच्या एकादशी दिवशी संबंध भाविक भक्त उपवास करून फराळाचे पदार्थ खातात अन् अशा दिवशी विठ्ठलास गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवणे म्हणजे एकादशी व्रताच्या तत्वांना विरोध करणारे आहे. "देवाला अर्पण केला जाणारा नैवेद्य हा भक्तांच्या आचारसंहितेशी सुसंगत असावा," असेही त्यांनी नमूद केले.
विठ्ठल पाटील महाराज यांनी मंदिर समितीकडे या प्रथेबाबत लेखी खुलासा करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, पोथ्या-पुराणातील संदर्भ देऊन अशा प्रकारचे कर्मकांड राबवणे योग्य नाही. यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
दुसरीकडे, धार्मिक श्रद्धा आणि परंपरा यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने हा वाद पुढे आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विठ्ठल मंदिर समिती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली असल्याचे भाविकातून चर्चा होत आहे.