राज्यात गारठा कमी, उकाड्यात वाढ

राज्यात गारठा कमी, उकाड्यात वाढ

---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) :  राज्याच्या कमाल, किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्याच्या किमान तापमानात चांगलीच वाढ झाल्याने गारठा  कमी झाला आहेकोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ हवामान  झाल्याने उकाडाही वाढला आहे. आज (ता. २६) विदर्भात गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यानंतर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती अरबी समुद्र आणि केरळच्या किनाऱ्यालगत असून, या वाऱ्यामुळे समुद्रावरील बाष्पयुक्त वारे कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या मराठवाड्याकडे येत आहे.

या भागात ढगाळ हवामान होत असून, किमान तापमानात वाढ होण्याबरोबरच दिवसा उकाडा जाणवू लागला आहे. उत्तर अंदमान समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढतच असून, राजस्थानमधील चुरू येथे शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा १३ अंशांच्या पुढे गेल्याने गारठा कमी झाला आहे. उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात पहाटे गारठा कायम आहे. आज (ता. २६) राज्यात कोरड्या हवामानासह किमान आणि कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात गारठा वाढण्याचे संकेत आहेत.शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३१.८ (१५.९), नगर (१७.१), जळगाव ३१ (१५.७), धुळे ३० (१०), कोल्हापूर ३१ (२१.५), महाबळेश्‍वर २६.८(१६.६), नाशिक ३०.४ (१३.४), निफाड ३०.१ (११.२), सांगली ३१.५ (२०.४), सातारा ३१.५ (२०.४), सोलापूर ३२.८ (२१.७), सांताक्रूझ ३३.३ (२०.६), डहाणू ३०.१ (१९.३), रत्नागिरी ३४ (२३.१), औरंगाबाद ३०.६ (१३.४), नांदेड - (१७), परभणी ३१.१ (१५.६), अकोला ३२.४ (१४.२), अमरावती ३१.२ (१४.५), बुलडाणा ३१.६ (१४.२), ब्रह्मपुरी ३२.३ (१३.९), चंद्रपूर २९.२ (१५.४), गडचिरोली ३१.२(१३), गोंदिया २८.८(११.५), नागपूर ३०.२ (१२.७), वर्धा ३०.२ (१३.६), वाशीम ३०.८ (१२.६), यवतमाळ ३१(१२.५).