कृषि विभागाच्या विविध योजनांतून तालुक्यातील पावणेदोन हजार शेतकऱ्यांना लाभ जवळपास साडेकोटी रुपयांचे अनुदान वितरित - कृषी अधिकारी भागवत सरडे,

कृषि विभागाच्या विविध योजनांतून तालुक्यातील पावणेदोन हजार शेतकऱ्यांना लाभ जवळपास साडेकोटी रुपयांचे अनुदान वितरित - कृषी अधिकारी भागवत सरडे,

------------------------------------------------------------------------------------
        
पंढरपूर,( दै.पंढरी नगरी न्यूज) शेतकरी बांधवांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींच्या खरेदीसाठी तसेच शेतामध्ये विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आर्थिक मदत मिळावी, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कृषि विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. पंढरपूर तालुक्यात कृषि विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून 1 हजार, 896 शेतकऱ्यांना 6 कोटी, 46 लाख, 12 हजार, 304  रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी भागवत सरडे यांनी दिली.

भागवत सरडे म्हणाले, शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच या योजना पारदर्शक व गतिमान पध्दतीने राबविण्यासाठी महाडीबीटी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्र शिकण्यापासून ते अनुदानावर शेतीसाठी आवश्यक उपकरणे खरेदी करता येत आहेत. कृषि विभागाच्या माध्यमातून प्रामुख्याने बियाणे, यंत्र व अवजारे, ठिबक तुषार संच इत्यादींची खरेदी तसेच शेततळे, खोदकाम, प्लास्टिक अस्तरीकरण, कांदा चाळ, शेडनेट गृह व हरितगृह उभारणी, फळबाग लागवड नियोजन, कृषि यांत्रिकीकरण आदि योजनांचा समावेश असल्याचे श्री. सरडे यांनी  सांगितले.
          
पंढरपूर तालुक्यात कृषि विभागामार्फत सन 2022-23 या आर्थिक वर्षात कृषि यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, वैयक्तिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, कांदाचाळ अशा विविध योजनांतून 1 हजार 896 शेतकऱ्यांना 6 कोटी 46 लाख 12 हजार 304 रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. सरडे यांनी केले आहे.