सरकारला सत्तेची मस्ती आलीये; सांगलीत अजित पवारांचा हल्लाबोल..
------------------------------------------------------------------------------------
सांगली (दै.पंढरी नगरी न्यूज ) : राज्यातल्या सत्ताधाऱ्यांना मस्ती आली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. तसेच, खालच्या पातळीवरचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात आले आहे, असा आरोपही अजित पवार यांनी केला आहे. ते तासगावच्या आरवडे येथे बोलत होते.
अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, आज दिवसभर अजित पवार तासगाव तालुक्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. तासगावच्या आरेवाडी या ठिकाणी अजित पवार दाखल झाले असून, त्यांच्या हस्ते आरेवाडी ग्रामपंचायतीच्या नूतन ग्रामसचिवालय इमारतीचा लोकार्पण आणि विविध विकासकामाचा शुभारंभ पार पडला. राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार, आर. आर. पाटील व मान्यवर मंडळी उपस्थित होते.
लोकशाही आणि संविधान धोक्यात : - यानंतर पार पडलेल्या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, सरकारचे काय चाललेय, आम्ही आणि आर. आर. पाटलांना अनेक वर्षे सत्तेमध्ये होतो. पण, आम्ही असे कधी चुकीचे वागलो नाही. राज्यातील सरकारला सत्तेची मस्ती आली आहे. पक्षांतर बंदी कायदाला तिलांजली दिली आहे. कर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये सरकार पाडले. हे सर्व ५० खोके, सरकार ओके अशा खालच्या पातळीवरचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल. राज्याच्या मंत्रिमंडळात एक पण महिला नाही. तुमच्या पोटात दुखतेय का? महिलांना का घेत नाही? विस्तार पण करीत नाही.
राज्यात अत्यंत गलिच्छ राजकारण :- राज्यात अत्यंत गलिच्छ राजकारण सुरू आहे. मंत्रिमंडळ पण वाढवत नाही, सगळ्यांना मंत्री करतो म्हणून गाजर दाखवले. मात्र, सत्ताधाऱ्यांना भीती वाटत आहे का मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा? केंद्राच्या साखर निर्यात धोरणावर विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी सडकून टीका केली. केवळ कोटा पद्धत धोरण घेऊन उत्तर प्रदेशचा फायदा केला. आम्ही ओरडून सांगतोय पण कोणी ऐकत नाही.
महाराष्ट्रात प्रचंड साखर शिल्लक महाराष्ट्रात प्रचंड साखर शिल्लक असून, निर्यातीचा कोटा वाढवला तर राज्याच्या शेतकऱ्यांना ६०० रुपये अधिकचा दर मिळेल. पण, आमच्या शेतकऱ्यांच्या हातात देवळातील घंटा देण्यात येत आहे. या सरकारचे काय चाललेय, छत्रपती यांच्याबद्दल बेताल बोलतात. आम्ही कसे खपवून घ्यायचे. शाहू, फुले आणि कर्मवीर यांच्या बद्दलसुद्धा बोलले जाते. सरकारचे आमदार, मंत्रीदेखील बोलत आहेत. त्यांना लाज लज्जा शरम आहे, का नाही? छत्रपती संभाजी महाराजांबद्दल स्वराजरक्षक वक्तव्याचा पुन्हा उच्चार करीत, मी काही चुकीचे बोललो नाही. पण, ज्यांनी महापुरुषांच्या अवमान केला त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी विरोधाकांकडून टुकारपणा चालू आहे, असा आरोप अजित पवारांनी केला आहे.