हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते निलंबित ; 'या' कारणामुळे झाली कारवाई..!

हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते निलंबित ; 'या' कारणामुळे झाली कारवाई..!

------------------------------------------------------------------------------------

पुणे( दै.पंढरी नगरी न्यूज) : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना निलंबित करण्याचे आदेश राज्य शासनाच्यावतीने शुक्रवारी रात्री काढण्यात आले.

हडपसर येथील जमिनीच्या प्रकरणात कोलते यांच्याकडून चुकीचे आदेश करण्यात आल्याचे निलंबनाच्या आदेशात म्हटले शिवाय कोविड काळात औषध खरेदीतील अनिमितता आणि निवडणूक विषयक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी कोलते यांच्याविरोधात होत्या, त्याआधारे कोलते यांना निलंबित करण्यात आल्याचे निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे.

तृप्ती कोलते गेल्या दोन वर्षापासून हवेली तहसीलदार म्हणून काम पाहत आहेत. संपूर्णपुणे शहर आणि शहरालगतच्या ग्रामीण भागाचा हवेली तालुक्यात समावेश आहे. त्यामुळे हवेली तहसीलदार हे पद कामाच्यादृष्टींने संवेदनशील मानले जाते.

हडपसर येथील जमीन प्रकरणात तत्कालीन महसूल मंत्री तसेच जिल्हाधिकारी आणि वरिष्ठांचे आदेश लक्षात न घेता निर्णय देताना अनियमितता करण्यात आल्याचा प्रमुख आरोप कोलते यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

कोविड काळात करण्यात आलेली औषध आणि आवश्यक साहित्य खरेदी प्रकरणात शासनाने घालून दिलेली विहित नियमावली न पाळता त्यात अनियमितता झाल्याचा आरोप निलंबनाच्या पत्रात करण्यात आला आहे. निवडणूक विषयक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असल्याचेही निलंबन आदेशात म्हटले आहे.