शेतकऱ्याच्या वीज प्रश्नावर आठ दिवसात तोडगा काढावा महावितरणच्या आढावा बैठकीत आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर,

शेतकऱ्याच्या वीज प्रश्नावर आठ दिवसात तोडगा काढावा महावितरणच्या आढावा बैठकीत आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर,

------------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा  (दै.पंढरी नगरी न्यूज) : (जि. सोलापूर)  मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विजेबाबतच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत, त्या तात्काळ सोडविण्यात याव्यात.शेतकरी व वीज ग्राहकाची आर्थिक पिळवणूक होऊ नये, यासाठी मी रात्र -दिवसभर काम करत आहे. असे सांगितले.

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर आज आमदार समाधान आवताडे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात बैठक आयोजित केली हेाती. त्यात आवताडे यांनी इशारा दिला.

आवताडे म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नावर आठ दिवसांत तोडगा काढावा, त्यावर थातूरमातूर उत्तरे न देता योग्य तो साक्षमोक्ष लावावा; अन्यथा पुन्हा पंधरा दिवसांत बैठक घेवू. शेतकऱ्यांच्या तक्रारी कशा कमी करता येईल, याकडे लक्ष द्यावे. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, तसेच त्यांची लूट होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी या वेळी केली. आमदार समाधान आवताडे यांनी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती केल्यामुळे बैठकीस आलेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर म्हणाले की, शंभर ते तीनशे मीटरच्या कनेक्शनधारकांची यादी ठेकेदाराकडे देण्याअगोदर त्या त्या ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात यावी. मंजूर लाभार्थ्यांना मोबाईलवर मेसेज यावेत. आसबेवाडी येथील शेतकऱ्यांची कमी कनेक्शनधारकाला जास्त क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवले जातात. जास्त कनेक्शनधारकाला कमी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवले जात आहेत, अशी तक्रार आहे.

प्रहारचे समाधान हेंबाडे यांनी नवीन कनेक्शनधारकाला सहा महिने मीटर दिला जात नाही, काही वेळेस खासगी दुकानातून मीटर विकत घेण्याची सूचना दिल्या जातात. मीटरसाठी होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी. नांदूर येथील परमेश्वर येणपे यांनी ३३ केव्ही सबस्टेशनचे काम रखडले आहे, ते तात्काळ पूर्ण करावे. भाळवणी येथील महादेव साखरे यांनी महावितरणचे कर्मचारीच वीजतारा काढून विकत असल्याच्या तक्रार केली, तर वसंत गायकवाड या शेतकऱ्याच्या शेतीपंपाचे मंजूर पोलपैकी तीनच पोल उभे केले आहेत. बाकीचे पोल उभा केले नाहीत, त्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार केली.

भोसे येथील अशोक भगरे यांनी महावितरणच्या चुकीमुळे बेदाणा शेडचे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई अद्याप दिली नसल्यामुळे मला न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागला, अशी व्यथा मांडली. डोणज येथील अशोक केदार यांनी मंजूर असलेल्या ट्रान्सफॉर्मरचे काम करीत नसल्याची तक्रार केली. हुन्नूर येथील ३३ सब स्टेशनला पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नसल्याची तक्रार शिवाजी कोरे यांनी केली.

महावितरणच्या कारभाराबाबत सर्वाधिक तक्रारी आमदार समाधान आवताडे यांच्या निदर्शनास आल्या. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहातील वाढती गर्दी लक्षात घेता आवताडे यांना विश्रामगृहाच्या बाहेर बैठक घ्यावी लागली.

या वेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, पंढरपूर महापारेषणचे अधीक्षक अभियंता शेळके, कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील, कार्यकारी अभियंता बी. ए. भोळे, उपकार्यकारी अभियंता बी. डी. चोरमुले, भाजप संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, नियोजन मंडळाचे सदस्य प्रदीप खांडेकर, सोमनाथ अवताडे, माजी नगरसेवक कैलास कोळी ,धनंजय पाटील , बिबीशन बेद्रे ,युवराज शिंदे, दिगंबर यादव, संजय बेंद्रे, नंदकुमार जाधव, बापूसाहेब मेटकरी ,धनाजी गडदे परमेश्वर यनपे, राजकुमार स्वामी, सुनील कांबळे, कौठळीचे सरपंच अनिल नागटिळक,  सिद्धेवाडी ग्रामपंचायत सदस्य बालाजी जाधव आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.