छत्रपती उदयनराजेंचा संताप भाजपला जड जाणार?

छत्रपती उदयनराजेंचा संताप भाजपला जड जाणार?

-----------------------------------------------------------------------------------

मुंबई (दै.पंढरी नगरी न्युज) : महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्यं केली जात आहेत. त्यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांविषयी केलेलं ते वक्तव्य भलतेच चर्चेत आले होते. त्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावरुन मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.

राज्यपाल यांच्या वक्तव्यानंतर भाजपचे प्रवक्ते सुधांशू द्विवेदी यांनी शिवाजी महाराज आणि माफीनामा यावर केलेलं वक्तव्य तर आणखी वातावरण गंभीर करणारे होते. आज जयंत ओढा यांनी देखील शिवाजी महाराजांवर केलेली टिप्पणी वादाचा विषय ठरली आहे. त्यांनी शिवराय जसे आग्रातून सुटले तसे एकनाथ शिंदे हे देखील गुवाहाटीला गेले. अशा आशयाचे विधान केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे. यासगळ्यावर उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली आहे.

उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत आपली नाराजी व्यक्त केली होती. आजही त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सध्याच्या राजकारण आणि फायद्यासाठी शिवाजी महाराजांबाबत केली जाणारी वक्तव्यं याविषयी खंत बोलून दाखवली आहे. दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उदयनराजे हे कमालीचे भावूक झाले होते. शिवाजी महाराजांचा असा अपमान पाहणे यापेक्षा मी मेलो का नाही असं बोलून त्यांनी आपली उद्विग्नता बोलून दाखवली होती. सोशल मीडियावर आता उदयनराजे यांचे बोलणे हे भाजपसाठी सणसणीत चपराक असल्याचे बोलले जात आहे .

सध्या उदयनराजे हे भाजपचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांच्याच पक्षातील नेत्यांकडून शिवाजी महाराजांवर वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्यं केली जात आहे. राजेंची गेल्या दोन ते तीन दिवसांतील ही दुसरी पत्रकार परिषद आहे. शिवाजी महाराजांवर सातत्यानं होणारी वक्तव्यं त्याचे उमटणारे पडसाद यामुळे उदयनराजे यांना आपली ठाम भूमिका मांडावी लागली आहे. त्याचा परिणाम भाजपवर कसा होतो, त्या पक्षातील नेत्यांची प्रतिक्रिया काय आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस यांनी उदयनराजे यांच्या प्रेस कॉन्फरन्सविषयी प्रतिक्रिया दिली होती. फडणवीस म्हणाले होते की, राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात. तेव्हा त्यांच्यापर्यत हा विषय गेला आहे. उदयनराजे यांची भूमिका मी समजू शकतो. तर शिंदे यांनी देखील उदयनराजे यांचे भावूक होणे विचार करायला लावणारे आहे अशा आशयाचे विधान केले होते. यामुळे आता सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. उदयन राजेंच्या पत्रकार परिषदा, त्यांची भूमिका आणि आक्रमकता हे भाजपला अडचणीत तर आणणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.