शहाजी पाटलांविरोधात शेकापने थोपटले दंड : हस्तक्षेप वाढल्याने सांगोल्यातील सरपंच आक्रमक; लढाईची तयारी..

---------------------------------------------------------------------------------

सोलापूर :(दै. पंढरी नगरी न्यूज ) : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील दलित वस्तीच्या कामांचा आणि आमदारांचा काय संबंध, असा प्रश्न उपस्थित करत सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या ४५ सरपंचांनी सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्या हस्तक्षेपाबद्दल बंड पुकारले सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील हे सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यांचा कामकाजात हस्तक्षेप वाढल्याने शेकापच्या सरपंचांनी थेट जिल्हा परिषदेचे मुख्यालय गाठत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत आमदारांचा हस्तक्षेप थांबविण्यात यावा, अशी विनंती केली आहे. त्यामुळे आगामी काळात सांगोल्यात शेकाप आणि शहाजी पाटील यांच्या गटात वाद पेटणार हे मात्र नक्की.

सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे सरपंच आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. २३ जानेवारी) जिल्हा परिषदेत येऊन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांची भेट घेतली. या निधीत आमदारांचा हस्तक्षेप होऊ देऊ नका, अशी मागणीही या वेळी शेकापकडून करण्यात आली. दलित वस्ती योजनेच्या कामांसंदर्भात ग्रामपंचायतींनी केलेला ठराव ग्राह्य का धरला जात नाही, असा प्रश्न उपस्थित करत सरपंचांकडून करण्यात आलेली यादी ग्राह्य धरण्यात यावी, अशी मागणीही या शिष्टमंडळाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्याशी चर्चा करून याबद्दल निर्णय घेऊ, असा शब्द अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी शिष्टमंडळाला दिला.

यावेळी सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, जिल्हा लेबर फेडरेशनचे अध्यक्ष बाबा कारंडे, दादासाहेब बाबर, संगम धांडोरे, संतोष पाटील, संतोष देवकते, बाळासाहेब काटकर, कल्याण लुबाळ, राजेंद्र देशमुख, संजीवनी लुबाळ, शाहजी गडहिरे, जयंत बाबर, ऋषीकेश शेटे, शरद हिप्परकर, गजेंद्र कोळेकर, दीपक गोडसे यांच्यासह सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते..