पोलिस प्रशासनाला आंदोलकांचे आंदोलन माघारी घेण्यात मिळाले यश.
---------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (दै.पंढरी नगरी न्यूज) :- मंगळवेढयात भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर विविध 16 जणांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान पोलिस प्रशासनाला यामध्ये 15 आंदोलकांशी समायोजन साधून ते मिटवण्यात यश आले आहे. दरम्यान केवळ एक आंदोलन अद्यापही प्रांत कार्यालयासमोर सुरू आहे.
दि.15 ऑगस्टच्या पार्श्वभुमीवर ब्रह्मपुरी येथील रिल स्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल होवूनही गेली दोन महिने आरोपीला अटक केली जात नसल्याने मयताचे वडील बाळासो शिवशरण यांनी पोलिसांच्या कर्तव्याच्या निषेधार्थ पोलिस स्टेशनसमोर कुटुंबियासह आमरण उपोषण करण्याचा लेखी इशारा दिला होता. पोलिस प्रशासनाने त्यांचेशी संपर्क साधून आरोपीला लवकरच अटक केली जाईल असे अभिवचन दिल्यामुळे बाबासो शिवशरण यांनी तुर्त आंदोलन स्थगित केले.
दुसर्या घटनेत बठाण येथील लक्ष्मी कोडगर या महिलेची अल्पवयीन मुलगी मागील एक महिन्यापासून बेपत्ता असून तशी पोलिसात नोंदही झाली आहे मात्र तपासिक अंमलदार तिचा शोध घेण्यात अपयशी ठरत असल्याने त्याचा निषेध म्हणून सदर मुलीच्या आईने दि.15 ऑगस्ट रोजी पोलिस स्टेशनसमोर सायंकाळपर्यंत पाेलीस मैदानात ठाण मांडून आक्रमक हाेत आंदोलन केले.पोलिसांनी त्यांची भेट घेवून मनधरणी करून अटक करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर उपोषण तुर्त थांबवले.
अरविंद नाईकवाडी व देवदत्त पवार हे प्रांत कार्यालयासमोर उपोषणास दोन दिवस बसले होते. मंगळवेढा तहसिल मधील पुरवठा विभागात खाजगी दोन इसम ठेवल्याने ते मोठया प्रमाणात कार्डधारकांची आर्थिक लूट करीत असल्याने त्यांना तात्काळ काढून टाकावे तसेच ते पुरवठा विभागातील मोठे दरोडेखोर असून त्यांना अधिकार्यांचा पाठिंबा असल्यानेच ते आर्थिक लूट करत असल्याचा आंदोलकांचा आरोप होता. जे कार्डधारक त्यांच्या मागणीनुसार पैसे देतील त्यांचीच कामे केली जात असे तर जे पैसे देत नाहीत त्यांना सर्वर डाऊन असल्याचे सांगून वारंवार माघारी पाठवत आहेत. प्रांत अधिकारी यांनी कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आले आहे.
नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष येताळा भगत यांचे आंदोलन पंचायती समोर सुरू होते. पंचायत समितीकडून त्यांच्या मागण्याबाबत लेखी पत्र देण्यात आले तसेच आमदार समाधान आवताडे यांनी मध्यस्थी केल्याने हे आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आले.
महादेव साखरे (भाळवणी) यांना त्यांच्या मागणीनुसार कृषी विभागाने पत्र दिल्यामुळे त्यांनी ही आंदोलन थांबवले आहे.
महादेव पवार (बालाजीनगर) यांच्या मागणीनुसार प्रशासनाने लेखी पत्र दिल्याने आंदोलन थांबवण्यात आले.
डॉ.दत्तात्रय माळी यांनी भुमिअभिलेखच्या उपअधिक्षक विद्या तांगडे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यांनाही कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले आहे.
अपंग संघटनेचे समाधान हेंबाडे यांनी विज वितरण कंपनी विरूद्ध आंदोलन इशारा दिला होता. रस्त्यावरील एम.एस.ई.बी.चे पोल अडथळा ठरत असल्याने ते काढून घ्यावे अशी त्यांची मागणी होती. विज वितरणने काढण्याची हमी दिल्याने आंदोलन थांबवण्यात आले.
हेमलता उपासे यांनीही न्यायालयातील प्रकरणाबाबत आंदोलन इशारा दिला होता. त्यांनी तुर्त आंदोलन स्थगित केले.
सुरेश गाडे यांनी बोराळे नाका ते सांगोला नाका या दरम्यान बेकायदा असलेले अतिक्रमण काढून घ्यावे अशी मागणी होती त्यांनाही लेखी आश्वासन दिल्यानंतर तुर्त आंदोलन थांबवण्यात आले.
आंदोलनकर्त्याशी समायोजन साधून ते मिटवण्याकामी डी.वाय.एस.पी.बसवराज शिवपुजे व पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागाचे पोलिस हवालदार दिगंबर गेजगे यांनी यासाठी परिश्रम घेतले.