विद्यार्थ्यांनी घेतला सायबर सुरक्षिततेचा धडा; डिजिटल जगात सतर्क राहण्याचा संदेश.

विद्यार्थ्यांनी घेतला सायबर सुरक्षिततेचा धडा; डिजिटल जगात सतर्क राहण्याचा संदेश.

-----------------------------------------------------

जळगाव ( दै.पंढरी नगरी न्यूज ):-

दि.३ ऑगस्ट २०२६:- विद्यार्थ्यांना सुरक्षित डिजिटल जीवनशैलीची जाणीव करून देण्यासाठी बा. च. भाटिया माध्यमिक विद्यालय, साकरे येथे सायबर अवेअरनेस सत्राचे आयोजन करण्यात आले. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य माहिती मिळणे आवश्यक असल्याने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सायबर वॉरियर विद्या विशाल सोनवणे आणि साक्षी तानाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन जगातील विविध धोके, सोशल मीडिया सुरक्षेचे महत्त्व, पासवर्ड सुरक्षा, फिशिंग हल्ले आणि डेटा चोरी यांसारख्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना अनेक प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून सायबर गुन्हे कसे घडतात याची माहिती देण्यात आली.

सत्रादरम्यान हॅकरच्या भूमिकेवर आधारित विशेष सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगार कोणत्या पद्धतीने लोकांना जाळ्यात ओढतात याची स्पष्ट कल्पना मिळाली. विविध खेळ आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण सत्र अधिक प्रभावी ठरले.

यावेळी विद्यार्थ्यांना कोणत्याही अनोळखी व्यक्तीस ओटीपी, पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका अनिता पाटील यांचे सहकार्य लाभले. आर. बी. आमले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सत्र यशस्वीरीत्या संपन्न झाले.