मंगळवेढा तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ पोलिसांसमोर चोर शोधणे आव्हान ◼️ब्रम्हपुरी परिसरातील शेतकऱ्यांच्या,17 हजार 800 रुपये किंमतीच्या केबला लंपास. ◼️अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल....
---------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (दै.पंढरी नगरी न्यूज) :-
ब्रम्हपुरी परिसरात शेती पंपाच्या पाच शेतकर्याच्या 17 हजार 800 रुपये किंमतीची तांब्याची केबल चोरट्याने चोरुन नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुध्द पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान केबल चोरट्याने ब्रम्हपुरी परिसरात धुमाकूळ घातला असून पोलीस चोरट्याचा सी.सी.टी.व्हीच्या माध्यमातून कसून शोध घेत आहेत.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी उमेश सज्जन पाटील हे एक शेतकरी असून जुना पंढरपूर रोड लगत त्यांची शेती आहे. दि.10 ऑगस्ट रोजी गट नंबर 57/2 ब्रम्हपुरी येथील 30 मिटर केबल 2 हजार 800 रुपये किंमतीची चोरुन नेली आहे. त्याचप्रमाणे रावसो पाटील यांची 3 हजार रुपये किंमतीची,सचिन पाटील यांची 3 हजार रुपये किंमतीची तर सोलापूर मंगळवेढा हायवे लगत असलेल्या ब्रम्हपुरी हद्दीतील देवीदास पुजारी यांची 5 हजार रुपये किंमतीची त्याच बरोबर शिवाजी पुजारी यांची 4 हजार रुपये किंमतीची असा एकूण पाच शेतकर्यांची 17 हजार 800 रुपये किंमतीची तांब्याची तार असलेली केबल चोरट्यांनी नेली आहे. याचा अधिक तपास बोराळे बीटचे पोलीस हवालदार मनोज खंडागळे हे करीत आहेत. दरम्यान सध्या पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी एकीकडे त्रस्त झाला असताना रात्रीच्यावेळी चोरट्यांनी चक्क मोटरांच्या केबल वर डल्ला मारण्याचा उद्योग सुरु केल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे. अजूनही काही शेतकर्यांच्या केबल चोरीला गेल्या आहेत. मात्र त्यांनी आपली तक्रार पोलीसात नोंदवली नाही. दि.12 च्या मध्यरात्री पुन्हा चोरट्यांनी भीमा नदी काठावरील मोटरांची केबल चोरुन नेल्याची चर्चा गुरुवारी दिवसभर ब्रम्हपुरी परिसरात ऐकावयास मिळत होती. पोलीसांना चोरटे शोधणे एक आव्हान असून सी.सी.टी.व्ही. कॅमेरा व पाठीमागे पोलीसांच्या हिटलिस्टवर असलेले चोरटे यांचा शोध घेतला जाईल असेही सुत्रांकडून सांगण्यात आले.