जालना जिल्ह्यातील सकल मराठा बांधवांवर लाठी चार्ज निषेधार्थ रविवारी महाराष्ट्र बंद ठेवा; मराठा क्रांती मोर्चाची हाक
------------------------------------------------------------------------------------
सोलापूर (पंढरी नगरी न्यूज ) जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनानं हिंसक वळण घेतलं आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाकडून रविवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी चार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद हाक देण्यात आली आहे. या घटनेचे पडसाद राज्याच्या राजकारणात देखील दिसून आले आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जालना जिल्हा दौरा करणार आहे. या दौऱ्यादरम्यान शरद पवार आंदोलकांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवरली सराटी याठिकाणी 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह दहा लोक आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. त्यांचं हे आंदोलन शांततेच्या मार्गानं उपोषण करत सुरू होतं.
मात्र मनोज जरांगे यांची तब्येत बिघडल्यामुळे मराठा आंदोलकांनी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी या आंदोलनामध्ये हस्तक्षेप घ्यायला सुरुवात केली.
पोलिसांनी सुरुवातीला आंदोलकांशी चर्चा केली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर या ठिकाणी लाठी चार्ज झाला असल्याचं बोललं जात आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यात घडलेल्या लाठी चार्जच्या घटनेमध्ये अनेक आंदोलक आणि नागरिक जखमी झाले आहे. हे जखमी नागरिक आणि आंदोलन अंबड येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.
या जखमींची विचारपूस करण्यासाठी शरद पवार जालना आणि अंतरवरली सराटी या गावाला भेट देणार आहे. शरद पवार यांच्या या दौऱ्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे.