पंढरपुरातील आरटीओ कॅम्पवरील एजंट व महा-ईसेवा केंद्र चालक यांच्यावर कारवाई करा..

-----------------------------------------------------------------------------------
अ.भा.छावा संघटनेचे शहराध्यक्ष सागर चव्हाण यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार
-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर(दै.पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर शहरातील आरटीओ कॅम्पवर धुमाकूळ घालणाऱ्या एजंट व महा-ई सेवा केंद्राबाबत तहसिलदार पंढरपूर यांच्याकडे तक्रार दिली होती. मात्र कोणतीही सक्षम कारवाई न झाल्यामुळे अनाधिकृत एजंट व महा-ई सेवा केंद्र चालक यांची मनमानी उलट अधिक प्रमाणात वाढली असून एजंट व महा ई सेवा केंद्र चालक दोघे मिळून कॅम्पवर येणाऱ्या नागरिकांची बेसुमार प्रमाणे लुट करीत आहेत. यातील काही एजंट तर वाहन नावावर करण्यासाठी बोगस सह्या मारणे, बोगस विमा तयार करणे, बोगस चेसीज प्रिंट जोडणे अशा कामात माहीर झाले आहेत. ते बोगस काम न केल्यास अधिकाऱ्यांच उलट जाब विचारणे, अरेरावी करणे अशा पध्दतीने या अनधिकृत एजंटाचा धुमाकूळ कॅम्पवर चालू असून या अनाधिकृत एजंटला समुळ नष्ट करणे गरजेचे आहे अशी मागणी अ.भा.छावा मराठा युवा संघटनचे पंढरपूर शहराध्यक्ष सागर चव्हाण यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे तक्रार केली आहे.

या तक्रारीत असे म्हटले आहे की, काही ड्रायव्हिंग स्कुलचे चालक हे एजंट यांना हाताशी धरून अनाधिकृत कामांना खतपाणी घालत असून यांची एक गुंडाची टोळी तयार झालेली आहे. हे लोक कॅम्पवर येणाऱ्या लोकांना वेठीस धरत असून हे सर्व एजंट आरटीओ कॅम्पवर बसायचे बंद करणे गरजेचे आहे. हे सर्व एजंट कॅम्पवर बसणे बंद न केल्यास आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.