"पाटील, तुमच्यामुळेच आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले..." खेडभोसे ग्रामस्थांच्या भावना जरांगे - पाटलांच्या कानी
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज ) "पाटील, तुम्ही सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळेच संपूर्ण राज्यात जनजागृती झाली असून गावोगावी कुणबी नोंदी सापडत आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्रही मिळू लागले आहे, ही सर्व आपलंच देण आहे," अशा शब्दात खेडभोसे ग्रामस्थांच्या भावना मराठा युद्ध मनोज जरांगे पाटील यांच्याकडे व्यक्त करण्यात आल्या.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे, ओबीसी प्रवर्गामध्ये कुणबी प्रवर्गही असून राज्यातील अनेक भागात असलेल्या कुणबी नोंदी शोधून तेथील कुणबी समाजालाही ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाचे स्वरूप वाढत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ही आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू केले आहे.
या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कुणबी नोंदी सापडू लागल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथील तब्बल २४९ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यापैकी १२४ लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटपही करण्यात आले आहे तर अनेक प्रस्ताव हे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
खेडभोसे ग्रामस्थांना आपण स्वतः कुणबी असल्याची कल्पनाही नव्हती, मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर शासकीय नोंदी तपासली असता अनेक लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
या सर्व नोंदी सापडण्या पाठीमागे मनोज जरांगे पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्यामुळे खेडभोसे येथील कल्याणराव काळे सोसायटीचे चेअरमन बंडू पवार यांनी आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन, सकल मराठा समाज खेडभोसे यांच्यावतीने त्यांचे आभार मानले तसेच त्यांच्या आंदोलनाला खेडभोसे ग्रामस्थांचा
पहिल्यापासूनच सक्रिय पाठिंबा असून यापुढेही त्यांना साथ देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अभिवचन ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी रांझणी (ता. पंढरपूर) येथील यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक हनुमंत दांडगे, नागनाथ भाकरे, महादेव अनपट, रामचंद्र गांडुळे उपस्थित होते.