जी माणसं झाडं व पुस्तक वाचतात ती मानवता रुजवतात - मा .सुनिल चव्हाण सर.
------------------------------------------------------------------------------------
सांगोला (पंढरी नगरी न्यूज ) ; महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय, उदनवाडी या ग्रंथालयाला कै.माजी मंत्री पतंगराव कदम यांचे स्वीय सहाय्यक, ग्रंथप्रेमी मा. सुनिल चव्हाण सर (नेवरी) यांनी स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असणार २१ पुस्तकांचा संच ५८८३ रुपयांचा संच भेट म्हणून दिला. या पुर्वीही त्यांनी ५००१ रुपये व अनेक ग्रंथ भेट दिले आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत जनसंपर्क अधिकारी, ग्रामविकास मंत्री कार्यालय, मंत्रालय मुंबईचे मा. दिपक नारनवर साहेब हेही उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात मा. सुनिल चव्हाण व मा. दिपक नारनवर साहेब यांचा शाल , पुष्पहार व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागत माजी प्राचार्य व संस्थापक अध्यक्ष विठ्ठल वलेकर यांनी केले तर प्रस्तावना व पाहुण्यांची ओळख प्रा. मुकुंद वलेकर यांनी करून दिली. आपल्या मनोगतात मा. सुनिल चव्हाण सरांनी आपण कसे घडलो हे सांगताना 'कोसला' या कांदबरीचा दाखला दिला. आज मी जे काही आहे ते केवळ ग्रंथामुळेच हेही त्यांनी आवर्जुन सांगितले. आयुष्याच्या शेवटपर्यंत या ग्रंथालयात कायम येत राहिन हा शब्दही त्यांनी दिला. तद्नंतर मा. दिपक नारनवर साहेब आपले विचार व्यक्त करताना म्हणाले कि, माणसाची श्रीमंती ही त्याच्या पैशावरून नाही तर बौद्धीक कुवतेवर ठरते. माणूस म्हणून जगण्याची शिदोरी ज्ञानातून मिळते. तसेच ग्रामीण भागात असलेच्या या ग्रंथालयाचंही त्यांनी तोंडभरून कौतुक केले व त्यांच्याकडे उपलब्ध असलेला मौलिक ग्रंथाचा खजिना त्यांनी ग्रंथालयाला देणगी म्हणून देण्याचे जाहीर करून टाकले.
या कार्यक्रमाला चोपडीहून आलेले त्यांचे सहकारी बाबाजी बाबर, अभिजीत बाबर, हणमंत चव्हाण, जनार्दन बाबर, याबरोबर इतरही अनेकजण उपस्थित होते. वाचनालयाचे नियमित वाचक कवी शामराव गाडे, हरी सरगर, अर्जुन वलेकर, बापुसो गावडे यासह अनेक वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. मुकुंद वलेकर यांनी केले. तर आभार ग्रंथपाल विजय वलेकर यांनी मानले.