भाजपने निंबाळकरांच्या उमेदवारीची घाई केल्याने पक्षाचे मोठे नुकसान ,ही बाब मोहिते -पाटील यांना लाभदायी ठरली
---------------------------------------------------------------------------------
माढा( दै.पंढरी नगरी न्यूज ) लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चा ही माढा मतदारसंघाची झाली. माढ्यातून इच्छूक असलेले मोहिते पाटील यांना विश्वासात न घेताच भाजपने पहिल्याच यादीत विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली.निवडणूक अवघड करून टाकली. निंबाळकरांच्या उमेदवारीमुळे मोहिते पाटील यांना तयारी करायला पुरेसा कालावधी मिळाला, त्या कालावधीत मोहिते पाटील यांनी मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी करत निंबाळकरांना कडवे आव्हान देण्याइतपत अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यात यश मिळविले. पुढे त्यांना शरद पवारांबाबत असलेल्या सहानुभूतीची जोड मिळाली आणि अवघ्या काही दिवसांत मोहिते पाटील यांनी निंबाळकरांना कडवी टक्कर दिली.
मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार असूनही मोहिते पाटील यांनी माघार घेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी मान्य केली होती. मात्र, निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात गेल्या पाच वर्षांपासून अंतर्गत संषर्घ धुसमसत होता. त्याकडे भाजपश्रेष्ठींनी सोयीप्रमाणे दुर्लक्ष केले. मोहिते पाटील हे भाजप सोडून कोठे जातील, असा एक प्रवाह भाजपमध्ये होता. त्यातून निंबाळकरांची उमेदवारी माढ्यातून पुन्हा जाहीर झाली.
वास्तविक पाहता माढा लोकसभा मतदारसंघासाठी धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून इच्छुक होते. मोहिते पाटील आणि नाईक निंबाळकर दोघांकडूनही भाजपच्या उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू होते, त्यामुळे या दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार, याची उत्सुकता होती. वाद नको; म्हणून या दोघांपैकी तिसरा उमेदवार येऊ शकतो, अशी चर्चा होती. मात्र, महाराष्ट्र भाजपच्या 13 मार्च रोजी जाहीर झालेल्या पहिल्या यादीतच निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली, त्याच ठिकाणी भाजपने सर्वात सेफ असलेल्या मतदारसंघात आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. कारण, मोहिते पाटील यांना डावलल्याची नाराजी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. उमेदवारी जाहीर झाल्यापासून अर्ज भरण्यापर्यंत मोठा कालावधी मोहिते पाटील यांना यांनाा मिळाला.भाजपकडून निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटलांनी माढा मतदार संघात भेटीगाठीला सुरुवात केली. त्या अगोदरही ते फिरत होते. मात्र, तेवढा जोश दिसत नव्हता. निंबाळकरांना उमेदवारी दिल्यामुळे डावलले गेल्याची नाराजी मोहिते पाटील समर्थकांमध्ये दिसू लागली.
उमेदवारीत डावलल्यानंतर मोहिते पाटील यांनी भेटीगाठीची सुरुवात करमाळ्यातून केली. संपूर्ण मतदारसंघात भेटीगाठी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांचा अंदाज घेऊन मोहिते पाटलांनी भाजपच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादीत प्रवेश करून राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली. मोहिते पाटील भाजपच्या विरोधात जातील, असे भाजपच्या नेतेमंडळींना आणि जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनाही वाटत नव्हते.
महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी उमेदवारीसाठी वाद होता. त्या सर्व ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यास भाजपकडून वेळ घेण्यात आला. माढ्याबाबात मात्र असे झाले नाही. त्याचाच फायदा उठवत मोहिते पाटलांनी मतदारसंघात जोरदार बांधणी केली आणि पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत ही निवडणूक लढवली. कदाचित भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यास वेळकाढूपणा केला असता तर मोहिते पाटलांना संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करण्यास तेवढा वेळ मिळाला नसता. भाजपच्या वरिष्ठांनीही आपल्या मागणीचा विचार केला ही भावना मोहिते पाटील व त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाले असती आणि माढा लोकसभा मतदारसंघात वेगळी लढत पाहायला मिळाली असती. पण माढ्यात भाजपला उमेदवारी जाहीर करण्याची अतिघाई नडल्याचे मानले जात आहे.
मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोणतीही अपेक्षा न ठेवता भाजपने दिलेल्या उमेदवारांना निवडून आणण्यात मोहिते पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे या वेळी भाजपकडून आपल्यावर अन्याय झाल्याची भावना जनमाणसांत आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करण्यात मोहिते पाटील यांना यश आले. तसेच, शरद पवारांबद्दल असलेली सहानुभूती याचाही त्यांना फायदा झाल्याचे मतदानातून दिसून आले.