आपल्याच मातीतील आपल्याच माणसांनी केलेला सन्मान हा राष्ट्रीय पुरस्कारासमानच असतो -- प्रसिद्ध ग्रामीण कथाकार : आप्पासाहेब खोत
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या आदर्शवत ठरलेल्या व्यक्तीच्या सन्मानाची सुरुवात आपल्या घरापासून करायला हवी आपल्याच मातीतील आपल्याच माणसानी केलेला सन्मान हा राष्ट्रीय पुरस्कारा समान असतो असे मत प्रसिद्ध ग्रामीण कथाकार थोर विचारवंत आप्पासाहेब खोत यांनी व्यक्त केले. (सिद्धेवाडी ) ता. पंढरपूर येथील यशवंतराव चव्हाण सामाजिक प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील सेवानिवृत्त बांधवांचा कृतज्ञता सन्मान सोहळा आणि गावातील आदर्श शेतकरी व आदर्श कृषीश्रमिक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खोत सर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या सरपंच रोहिणी जाधव होत्या . पुढे बोलताना आप्पासाहेब खोत म्हणाले की, सन्मानाची सुरुवात ही घरापासूनच करायला हवी. आपल्या माणसाचा सन्मान आपणच केला, तरच बाहेरचेही मान देतील. अभावाने दिसणारे हे चित्र आणि असा प्रेरणादायी कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो, ही सगळ्या सिद्धेवाडीकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. सेवाकाळात प्रत्येक सेवक हा जमेल तशी आपल्या कुटुंबीयांची, समाजाची , सहकाऱ्यांची आणि गावाची थोडीफार सेवा करतच असतो. तो सेवानिवृत्त झाला, की त्या सेवेतून उतराई म्हणून त्या-त्या ठिकाणची संबंधित संस्था त्यांचा सत्कार करत असते. पण संपूर्ण गावाने सामाजिक बांधिलकीने केलेला सन्मान आपुलकीचं एक वेगळंच नातं निर्माण करतो. सेवानिवृत्त बांधव, आदर्श शेतकरी आणि कष्टकरी यांचा सन्मान करण्यासाठी खूप मोठं मन असावं लागतं असा विचार त्यांनी व्यक्त केला.

आप्पासाहेब खोत सर यांच्याबरोबर त्यांचे स्नेही प्रा. विजयराज जाधव , शिक्षक नेते नागनाथ क्षीरसागर गुरुजी, पाटील सर हे विचारपिठावर उपस्थित होते. प्रा. सिद्धेश्वर जाधव यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून सरपंच रोहिणी जाधव यांची निवड केली. दीपक जाधव सर यांनी अनुमोदन दिले. व्यासपीठावर उपसरपंच लक्ष्मण गोडसे सर, रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव प्राचार्य डॉ. जे. जी.जाधव, विठ्ठल कारखान्याचे तज्ञ संचालक दशरथ जाधव, वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव, जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक डी. डी. गोडसे सर आणि पोलीसपाटील दत्तात्रय जाधव उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती संभाजी महाराज आणि बळीराजा यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सर्वांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून सोहळ्याची सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे, अध्यक्षा आणि मान्यवरांचा स्वागतपर सत्कार चंद्रदीपक भालेकर गुरुजी, सुरेखा जाधव, दत्तात्रय जाधव सर, मधुकर भोपळे, प्रा. किशोर जाधव, विशाल नागटिळक, फोटोग्राफर सचिन जाधव आणि तात्यासाहेब गोडसे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि ग्रामीण कथाकार आप्पासाहेब खोत सर यांचा संपूर्ण परिचय नितीन पाटील (गुरुजी ) यांनी करून दिला. यानंतर खोत सरांनी त्यांच्या दोन कथा सादर केल्या. "कोंबडी" या कथेतून घरातील भांडण घरातच मिटवा, ते बाहेर जाऊ देऊ नका. लोकं फुकटचा तमाशा बघायला तयारच असतात. अशा वागण्याने आपल्या संपूर्ण घराचे नुकसानच होते, तसे होऊ नये, यासाठी घरातील वडीलधाऱ्या माणसांनी याला वेळीच आवर घालणं गरजेचे असते अशी शिकवण या कथेतून व्यक्त केली. "महापूर" या दुसऱ्या कथेतून त्यांनी बहीण-भावाच्या नातेसंबंधांवर भाष्य केले. स्वतःच्या स्वार्थापोटी नात्या-नात्यात अंतर पडत असताना संकटाच्या काळात एकमेकांना वेळीच थोडीफार मदत केली, तर पुढचे महासंकट आपण टाळू शकतो असे मत त्यांनी आवर्जून सांगितले. विवेकबुद्धीचा वापर करून, मनात प्रेमाचा ओलावा जपून नात्यातील अंतर वाढू न देणं ही सर्वांची जबाबदारी असल्याची जाणीव त्यांनी या कथेतून उत्तमप्रकारे मांडली.
सन्मान सोहळा कार्यक्रमात सेवानिवृत्त होणारे दयानंद कॉलेजचे प्रयोगशाळा सहाय्यक बाळासाहेब जाधव, मोहसीन हायस्कूल इसबावी येथील सहशिक्षक रमेश जाधव सर, प्राथमिक शिक्षक आनंद भोपळे , हवाई दलाचे अर्जुन गोडसे सपत्नीक सन्मान शाल, हार, छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा आणि विठ्ठलरुक्मिणीची मूर्ती देऊन करण्यात आले. गावातील प्रगतशील आणि आदर्श शेतकरी म्हणून पांडुरंग जाधव, आप्पा गोडसे, जितेंद्र जाधव यांचे, तर आदर्श कृषीश्रमिक म्हणून जयश्री भोपळे , ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी बाळासाहेब ननवरे यांचा सन्मान शाल, हार, बळीराजाची प्रतिमा आणि विठ्ठलरुक्मिणी मातेची मूर्ती देऊन करण्यात आला. कार्यक्रमासाठी नागनाथ क्षीरसागर, सुग्रीव एकमल्ली, सदाशिव जाधव, अविनाश कदम, बिरुदेव देवळे, नवनाथ क्षीरसागर, आर.आर. कांबळे , बेलभंडारे गुरुजी आणि बाळासाहेब शिंदे यांनी उपस्थिती होते . रमेश जाधव सर, आनंद भोपळे गुरुजी आणि पांडुरंग जाधव यांनी सत्काराला उत्तर देऊन सोहळा समितीला धन्यवाद दिले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंढरपूर तालुका मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नितीन जाधव सर, दगडू सावंतराव, विनोद जाधव गुरुजी, गणेश शिंदे सर, डॉ. सत्यवान जाधव, सदाशिव शिंदे, धनाजी जाधव गुरुजी, विलास भालेकर, सुधाकर शिंदे आणि गजेंद्र जाधव तसेच यशवंतराव चव्हाण सामाजिक प्रतिष्ठानचे सर्वच पदाधिकारी यांनी खूप सहकार्य केले. अध्यक्षीय भाषणात सरपंच रोहिणी जाधव यांनी सोहळा समितीच्या सर्व सदस्यांना धन्यवाद दिले. पक्ष, पद आणि पार्टी हा विचार बाजूला ठेवून यापुढेही विविध कार्यक्रमांना गावातील सर्व पदाधिकारी मनापासून सहकार्य करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गावातील सर्व पदाधिकारी आणि मान्यवर यांनी आम्हाला मोलाची साथ दिली आहे. 14 मे 2019 पासून कोरोना कालावधी वगळता आजवर तब्बल 51 सेवानिवृत्त बांधवांचा कृतज्ञता सन्मान, गावातील 12 आदर्श शेतकरी आणि 6 आदर्श कृषीश्रमिक यांचा सन्मान आम्ही करू शकलो, याचे सर्व श्रेय म्हणजेच संपूर्ण ग्रामस्थांचा आमच्यावरील विश्वास आणि गावातील सर्वच पदाधिकारी यांची साथ असल्याची माहिती एम .बी. जाधव यांनी व्यक्त केली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते . उपस्थित असणाऱ्या सर्वांचे सोहळा समितीच्या वतीने आभार मानले.