एकाच प्रकरणात दोन विरुद्ध न्यायनिवाडे केल्याप्रकरणी ; पंढरपूरचे तहसीलदार बेल्हेकरांना बडतर्फ करून त्यांची मालमत्ता जप्त करण्याची राधेश बादले - पाटील यांची आक्रमक मागणी

एकाच प्रकरणात दोन विरुद्ध न्यायनिवाडे केल्याप्रकरणी ; पंढरपूरचे तहसीलदार बेल्हेकरांना बडतर्फ करून त्यांची मालमत्ता जप्त करण्याची राधेश बादले - पाटील यांची आक्रमक मागणी

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) : अर्थपूर्ण व्यवहारातून एकाच प्रकरणात दोन विरुद्ध न्यायनिवाडे करून अर्धन्यायीक न्यायालयांची प्रतिमा मलिन केल्याने पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकरांची मालमत्ता जप्त करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी राधेश बादले पाटील यांनी केली आहे.
      
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुशील बेल्हेकर तहसीलदार पंढरपूर यांचे न्यायालयातील प्रकरण क्रमांक रस्ता कलम -१४३/एस आर/०१/२०१९ आदेश दि.२१-०९-२०२२ मध्ये सुशील बेल्हेकर यांनी खाजगी इसमाकडून न्यायनिर्णय आदेश तयार करून, त्यावर आपली सही शिक्का करून अर्थपूर्ण संबंध ठेवीत, दोन वेगवेगळे न्यायनिर्णय आदेश पारित केले आहेत. या एकाच प्रकरणातील दोन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या न्यायनिर्णयावर पंढरपूर येथील न्यायालयात दावा दाखल झाल्यानंतर, यावरही कळस करून सुशील बेल्हेकर यांनी दुसरे गैरकत्य करित त्यातील एक न्यायनिर्णय आदेश फाडून टाकला आहे. या प्रकरणाची पंढरपूर तालुक्यात खुमासदार चर्चा रंगली असुनही पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर हे आपल्याच तोऱ्यात मिरवत आहेत.
     
पंढरपूर येथे तहसीलदार म्हणून सुशील बेलेकर हे कार्यरत आहेत, त्यांनी पंढरपूर तहसील कार्यालयातील तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून आजतागायत अनागोंदी कारभाराचे प्रदर्शन चालू ठेवले आहे. त्याचा पायबंद घालणे आवश्यक असून, त्यांच्या गैरकत्यामुळे अर्धन्यायिक न्यायालयांची प्रतिमा मलिन होत आहे. तद्अनुषंगाने राधेश बादले पाटील यांनी हि बाब निदर्शनास आणून देण्याचे साहस केले आहे.
     
याबाबत माहिती अशी अर्जदार व सामनेवाले यांच्याशी वेगवेगळे अर्थपूर्ण व्यवहार करीत, एकाच प्रकरणात एक निकाल दि.२१-०९-२०२२ रोजी अर्जदार यांच्या बाजूने न्यायनिवाडा केलेला आहे, तर याच प्रकरणी दुसरा निकाल पारित करून अर्जदाराचा अर्ज नामंजूर करीत सामनेवाले यांच्या बाजूने न्यायनिवाडा करून, अकलेचे तारे तोडून, अर्धन्यायिक न्यायालयांची प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे पंढरपूर येथील तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना बडतर्फ करणे क्रमप्राप्त असल्याचे प्रतिपादन राधेश बादले पाटील यांनी केले आहे.

तसेच एकाच प्रकरणात दोन न्यायनिर्णय आदेश पारित करताना अर्जदार व सामनेवाले यांचे म्हणणे, स्थळ पाहणी पंचनामा, युक्तिवाद हा एकच आहे. तरीसुद्धा आपल्या पदाचा गैरवापर करण्याचे धाडसी गैरकत्य सुशील बेल्हेकर यांनी केलेले स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे सुशील बेल्हेकर यांना बडतर्फ करून त्यांची मालमत्ता जप्त करणे क्रमप्राप्त आहे. तसेच त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचेही आदेश वरिष्ठांनी संबंधितांना देणे क्रमप्राप्त असल्याचे मत राधेश बादले पाटील यांनी व्यक्त केले आहे.

      या प्रस्तुत प्रकरणासह बेल्हेकरांनी धान्य गोदामात धान्य घोटाळा केला आहे. तसेच बेल्हेकरांनी अनेक कागदपत्रांमध्ये हेराफेरी सुद्धा केली आहे. बेल्हेकरांनी शासकीय खर्चाच्या बिलांमध्ये प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार केला आहे. बोगस व बनावट बिलांच्या माध्यमातून लाखों रुपयांचा अपहार केला आहे.

त्याबाबत महालेखापालांमार्फत लेखापरीक्षण करून फौजदारी कारवाई करण्याचीही मागणी राधेश बादले - पाटील यांनी केली आहे. प्रस्तुत प्रकरणासह कोणताही न्यायनिर्णय आदेश स्वतः जातीने लक्ष घालून पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर हे करत नसून, त्यांनी त्यासाठी खाजगी इसम ठेवलेला आहे, तो खाजगी इसम न्यायनिर्णय आदेश पारित करून सुशील बेल्हेकर यांची सही घेतो. याबाबत सुशील बेल्हेकर यांची लायडिटेक्टर करणे क्रमप्राप्त असून, या बाबींचा साकल्याने विचार करता सुशील बेल्हेकर यांना तहसीलदार पदावर राहण्याचा अधिकार नाही. म्हणून त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करणे क्रमप्राप्त आहे, असे स्पष्ट मत राधेश बादले - पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
       
बेल्हेकरांना बडतर्फ न केल्यास १५ आँगष्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे राधेश बादले पाटील यांनी मुख्यमंत्री महोदयांसह महसूल विभागाच्या प्रधान सचिवांना व पुणे विभागीय आयुक्तांना कळविले आहे. यामुळे पंढरपूरसह पुणे विभागात खळबळ उडाली आहे.