समाजात आजही शिक्षकाचे स्थान अग्रस्थानी आहे :- माजी आमदार प्रशांतराव परिचारक उत्कृष्ट क्रीडापटू व सेवानिवृत्त शिक्षक नागनाथ क्षीरसागर यांचा सन्मान सोहळा कार्यक्रम प्रसंगी

समाजात आजही शिक्षकाचे स्थान अग्रस्थानी आहे :- माजी आमदार प्रशांतराव परिचारक  उत्कृष्ट क्रीडापटू व सेवानिवृत्त शिक्षक नागनाथ क्षीरसागर यांचा सन्मान सोहळा कार्यक्रम प्रसंगी

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज ) आजच्या युगात व बदलत्या जीवनशैलीमध्ये सगळीकडेच बदल झालेला असतानाही शिक्षकांचे कार्य मात्र अजूनही दीपस्तंभासारखे प्रेरणादायी असून, आजही समाजामध्ये शिक्षकांचे स्थान अग्रस्थानी आहे. शिक्षक हे समाजातील चालते बोलते विद्यापीठ असतात, त्यामुळे शिक्षकांनी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच बाहेरचे व्यवहारिक ज्ञानही द्यावे, असे आवाहन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले. चिचुंबे ता. पंढरपूर येथील रहिवासी असलेले प्राथमिक शिक्षक नागनाथ क्षीरसागर गुरुजी यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कासेगाव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव देशमुख होते. या वेळी आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते तुलसीहार, पूर्ण पोशाख, सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन नागनाथ क्षीरसागर गुरुजी यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.

पुढे बोलताना प्रशांतराव परिचारक म्हणाले की, नागनाथ क्षीरसागर यांनी आजपर्यंत केलेल्या शैक्षणिक, सामाजिक इ.कार्याचा उल्लेखनीय गौरव केला. तसेच क्षीरसागर गुरुजींनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या विशेष कार्याचा उल्लेख ही त्यांनी केला. अध्यक्षपदावरून बोलताना शरद पवार पक्षाचे राष्ट्रवादीचे नेते वसंतराव देशमुख म्हणाले की, क्षीरसागर गुरुजी यांनी तावशी येथील प्राथमिक शाळेत वृक्ष लागवडीसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने सर यांनी क्षीरसागर गुरुजींनी येत्या काळात तालुक्यातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात उज्वल भविष्य मिळण्यासाठी चळवळीचे नेतृत्व करावे असे आवाहन केले. याप्रसंगी पंढरपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष अनिरुद्ध पवार ,सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन तानाजी गुंड, सांगली बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे, शिक्षक नेते ज्योतीराम बोंगे, सुभाष मस्के ,मेटकरी सर, रूपाली आसबे, क्षीरसागर गुरुजींची पुतणी दिपाली कबाडे, नात विश्वा कबाडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी गुरुजींचा सन्मान करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

यावेळी सत्काराला उत्तर देताना नागनाथ क्षीरसागर म्हणाले की माझे उर्वरित आयुष्य हे सामाजिक कार्य व क्रीडा क्षेत्रासाठी समर्पित करण्यात असल्याचे अभिवचन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश कदम गुरुजी यांनी केले. सुत्रसंचालन सतीश बुवा, दयानंद देवळे यांनी केले. आभार शहाजी देशमुख यांनी मानले. कार्यक्रमासाठी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन हरीश गायकवाड , माजी चेअरमन दिलीप घाडगे , माजी नगरसेवक गणेश अधटराव, शिक्षक नेते तात्यासाहेब यादव, पंढरपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती पुरुषोत्तम पवार, सोलापूर जिल्हा प्राथमिक पतसंस्थेच्या संचालिका राणी होनमाने, आनंदराव क्षीरसागर, तावशी ग्रामपंचायत माजी सरपंच गणपत यादव व माजी सरपंच श्रीकांत जाधव, चेअरमन विजय बागल, ज्येष्ठ मुख्याध्यापक मारुती शिरगुर, उपस्थित होते .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजेंद्र पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली नागनाथ क्षीरसागर मित्रपरिवार व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परीश्रम घेतले. 

सदर कार्यक्रमास नागनाथ क्षीरसागर गुरुजी यांच्यावर प्रेम करणारे मित्र, सहकारी शिक्षक बंधू- भगिनी, नातेवाईक इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते.