सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची जिल्हा कार्यकारणी बरखास्त ◼️ प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या सूचनेने घेतला निर्णय;लवकरच नूतन कार्यकारणी होणार जाहीर...
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर(दै.पंढरी नगरी न्यूज):- सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या बळीराम काका साठे यांच्या रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षाच्या पदावर वसंतनाना देशमुख यांची निवड झाल्यानंतर पूर्वीची सोलापूर जिल्ह्यातील सर्व कार्यकारणी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या सूचनेप्रमाणे बरखास्त करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नूतन सोलापूर जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख यांनी दिली.
सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा बालेकिल्ला असून या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद मोठ्या प्रमाणात पूर्वीपासूनच दिसून येते. सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी असलेले बळीराम काका साठे यांचे पदावरून पाय उतार झाल्यानंतर सोलापूर जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खंदे समर्थक व सुरुवातीपासून शरदचंद्र पवार यांच्यासोबत असलेले त्याचबरोबर विजयसिंह मोहिते पाटील व सोलापूर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांशी सलोख्याचे संबंध असल्यामुळे वसंतनाना देशमुख यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. या निवडीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या सूचनेप्रमाणे सोलापूर जिल्हा कार्यकारणी तसेच सर्व तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे.
नूतन सोलापूर जिल्हा अध्यक्ष वसंतनाना देशमुख हे वरिष्ठ नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच नव्याने सोलापूर जिल्ह्यातील कार्यकारणी निवड करणार आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. त्याचबरोबर जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जागा निवडून आणण्याकरता प्रयत्नशील राहावे, यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे संकेत मिळत आहे. नुकतेच सोलापूर जिल्हा कार्यकारणी बरखास्त केल्याची पत्र जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख तसेच कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आले आहे.