चंद्रभागा वाळवंट व मंदिर परिसर कायम स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी - पालकमंत्री जयकुमार गोरे

चंद्रभागा वाळवंट व मंदिर परिसर कायम स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी - पालकमंत्री जयकुमार गोरे

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज):- श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी या प्रमुख यात्रांसह एकादशी दिवशी लाखो भाविक तसेच दररोज हजारो भाविक पंढरपूरला येतात. विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन येणाऱ्या लाखो भाविकांना विठुरायाच्या दर्शनासोबत चंद्रभागेचे स्नान केल्याशिवाय वारी पुर्ण केल्याचे समाधान मिळत नसते त्यामुळे वारकरी संप्रदायात विठ्ठल रुक्मिणी दर्शना एवढेच चंद्रभागेच्या पवित्र स्नानाला महत्त्व असल्याने चंद्रभागा वाळवंट व मंदिर परिसर कायम स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी अशा सूचना, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.

कार्तिक यात्रा नियोजनाबाबत केबीपी कॉलेज पंढरपूर येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ दीपक धोत्रे यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, मंदिर समिती व नगरपालिका प्रशासनाने चंद्रभागा वाळवंट व मंदिर परिसर येथील वारी कालावधीतच स्वच्छता न करता दररोज स्वच्छता करावी. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना स्वच्छता पाहून समाधान वाटले पाहिजे. तसेच वाळवंटात ज्यादा तात्पुरत्या शौचालयाची सुविधा उपलब्ध ठेवावी त्याचबरोबर वाळवंटात कायमस्वरूपी पर्यावरण पूरक शौचालय स्थापन करण्याबाबतचे नियोजन करावे. उघड्यावर शौचालयास बसू नये यासाठी जनजागृती व आवश्यक उपाययोजना कराव्यात. दर्शन रांगेतील भाविकांना तात्काळ व सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी यासाठी मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन तसेच दर्शन रांगेत घुसखोरी होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर भाविकांना सुरक्षा रक्षकांचा नाहक त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन, सुरक्षारक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित सुरक्षा रक्षक नेमावेत.