शेकापनं काय चुकीचं केलं...जे देशाने केलं तेच शेकापनं केलं
------------------------------------------------------------------------------------
सांगोला ( दै.पंढरी नगरी न्यूज) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुरोगामी पक्षाचा आधारस्तंभ असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजपबरोबर युती केली अन खूप मोठं पाप शेकापने केल्याची आवई विरोधकांनी नेहमीप्रमाणे उठवली खरं तर अशा निवडणुकांमध्ये युती अन आघाड्या या एकट्या सांगोल्यातच झाल्या का? याचं उत्तर नाही असं आहे.
कारण विधानसभा अन लोकसभेला ज्यांच्याविरोधात तलवारी उपसल्या तेच लोक तलवारी म्यान करुन एका छताखाली आल्याचे चित्र संपूर्ण राज्यभर पाहायला मिळत आहे. अशा निवडणुकांमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांचे हित, विकास अन स्थानिक राजकारणाचे संदर्भ पाहिले जातात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या विचारधारेपेक्षा शहराचे अन नागरिकांचे हित कशात आहे यालाच प्राधान्य देण्याचा इतिहास आहे. मात्र, सांगोल्यात शेकाप भाजपबरोबर गेला अन खूप मोठा भूकंप झाला की काय असे चित्र अज्ञानानी तयार केले. ज्यांना इतिहास माहीत नसतो तेच लोक वर्तमानाची वाट लावतात हाच इतिहास आहे. त्यामुळे त्याला सांगोला तालुक्यातील अज्ञानी विरोधक तर कसे अपवाद असतील. मुळात या देशात राजकारणाची सुरुवातच आघाडी अन युती या दोनच कुबड्यावर झाली आहे. संयुक्त किंवा आघाडी सरकार ही युरोपियन राजकीय व्यवस्थेत रूढ झालेली संकल्पना १९९० नंतरच्या भारतीय राजकीय प्रक्रियेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणून पुढे आली आहे. त्यामुळे १९८९ पासून ते २००४ पर्यंत झालेल्या सहा लोकसभा निवडणुकांत कोणत्याही एका राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही.
त्यामुळे या कालखंडात अल्पमतातील किंवा आघाडी सरकारे सत्तेवर आली. या सरकारने सत्ता स्थापन करताना विकास हाच अजेंडा ठेवत आघाडी अन युती केली आहे. ज्यांनी या सरकारला टेकू दिला त्यांच्याबरोबर यांचे वैचारिक मतभेद होतेच. पण सत्तेचा वेल मध्येच थांबवला तर विकासाची प्रक्रिया ठप्प होईल ही भीती ज्यांनी टेकू दिला त्यांना होती. त्यामुळे एक पाऊल मागे येत छोट्या पक्षांनी अनेक सरकारला गुलाल लावला आहे. मात्र, हे करत असताना या घटक पक्षांनी आपली विचारधारा कधीच सोडली नाही. ज्या ज्या वेळी या विचारधारेवर आक्रमण होतंय असं वाटलं त्या त्या वेळी घटक पक्षांनी सत्ताधारी प्रमुख पक्षाला वठणीवर आणण्याचे काम केले आहे हा इतिहास आहे.
मुळात राजकारणातील आघाड्या आणि युत्या म्हणजे एकत्र येऊन निवडणुका लढवण्यासाठी किंवा सरकार स्थापन करण्यासाठी पक्षांनी तयार केलेल्या रचना आहेत. आघाड्यांमध्ये पक्षांमधील मतभेद कमी करून समान ध्येयासाठी एकत्र येणे अपेक्षित असते. शेतकरी कामगार पक्षानेही सांगोल्यात हेच विकासाचे समान ध्येय ठेवले आहे. भाजपबरोबर नगरपालिकेत आघाडी करुन सांगोला शहरातील विकासकामांचा प्रवाह अधिक वेगवान करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजप सत्तेत आहे. सत्ताधारी पक्ष नेहमीच साथ देणाऱ्यांना झुकते माप देतो हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडून शहरासाठी निधी आणता येईल, त्यातून रखडलेली विकासकामे मार्गी लागतील हाच या युतीचा अन्वयार्थ आहे. राहिला प्रश्न विचारधारेचा...शेतकरी कामगार पक्षाने त्यांची विचारधारा कधीच सोडली नाही. ती सोडली असती तर विधानसभेला डॉ .भाई बाबासाहेब देशमुख यांना गुलाल लागला असता का..?
आमदार झाल्यानंतर याच डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी जिल्ह्यातील प्रश्नांवर सर्वाधिक वेळा विधानसभेत आवाज उठवला आहे. राज्यातील अनेक प्रश्न उपस्थित करत त्यांनी सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणले आहे. मुळात शेकाप हा स्वयंभू विचारधारा मानणार पक्ष आहे. या महाराष्ट्रात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पुरोगामी विचार कुणी बुलंद केला असेल तर तो शेतकरी कामगार पक्षाने केला. जिथे अन्याय झाला तेथे शेकापने कधीच कुणाची खैर केली नाही. त्यामुळेच आजही या महाराष्ट्रात असे एकही गाव नाही जिथे शेकापचा लाल बावटा खांद्यावर घेणारा कार्यकर्ता नाही. मुळात शरद पवार यांनी महाराष्ट्रात काँग्रेसमधून बाहेर पडून, विरोधकांची मोट बांधून, मुख्यमंत्रिपद मिळवलं होतं. याला पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोदचा प्रयोग म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखला जातं. विशेष म्हणजे त्यावेळी शरद पवार यांना वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडण्यास यशवंतराव चव्हाणांचाही अप्रत्यक्ष पाठिंबा होता. यशवंतराव चव्हाण हे काँग्रेसी विचारांचे पाईक होते. मात्र, परिस्थतीच अशी होती की पुलोदचे सरकार जन्माला घालण्याशिवाय यशवंतरावांकडे दुसरा पर्याय नव्हता. या सरकारमध्ये त्यावेळचा जनसंघ म्हणजे आताचा भाजप सामील होता. यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांचे जनसंघाबरोबर कधीच पटले नाही. मात्र, सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना जनसंघाची मदत घ्यावी लागली. पण याचा अर्थ या दोन्ही शीर्षस्थ नेतृत्वाला भाजपचा अर्थात जनसंघाचा विचार मान्य होता असा होत नाही. त्यांनी कधीच ही विचारसरणी स्वीकारली नाही. पण पुलोदचा प्रयोग करुन काहीकाळ स्थिर सरकार देण्यात ते यशस्वी ठरले होते हा इतिहास आपण कसा विसरायचा मुळात युती किंवा आघाडी ही एकाच विचारधारेची होते हा गैरसमज आहे. त्यामुळे ज्यांना असे वाटते त्यांनी महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणाचा अभ्यास करणे कधीही चांगले.
सांगोला नगरपालिकेत भाजपबरोबर आघाडी करताना शेतकरी कामगार पक्षाने त्यांची विचारधारा तूसभरही सोडलेली नाही. शेतकरी कामगार पक्षाची विचारधारा ही शेतकरी आणि कामगार यांच्या हक्कांसाठी लढणारी आहे. प्रखर लढ्याशिवाय किसान कामगारांचे राज्य स्थापन करता येणार नाही. कोणताही पक्ष, वर्ग संघटनांचे पाठबळ घेतल्याशिवाय सत्तारूढ झाला तरी तो पक्ष किसान कामगारांचे राज्य स्थापन करू शकणार नाही. या वर्ग संघटना केवळ आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अस्तित्वात न आणता त्या सामाजिक व आर्थिक क्रांतीच्या आधारस्तंभ बनल्या पाहिजेत,' हे या पक्षाच्या स्थापनेच्या वेळचे धोरण आखले होते आणि आजही पक्ष याच धोरणावर कार्यरत आहे. मार्क्सवाद- लेनिनवादाच्या तत्त्वांचे पालन करणारा हा पक्ष सूर्य, चंद्र अन तारे असेपर्यंत आपला पुरोगामी वारसा कधीच सोडणार नाही. राज्यात कष्टकरी शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या अनेक पक्ष, संघटना आहेत, पण तरीही गेल्या ७५ वर्षांत येथील शेतकऱ्यांना आपल्या न्याय हक्कासाठी शेकापच आठवावा लागतो त्याचे कारण या पक्षाच्या नसानसात पुरोगामी चळवळीची शेती, माती अन संस्कृती आहे.