स्वरपंढरी”तून स्थानिक गुणवंत कलाकारांची विठुरायाच्या चरणी सुरेल गायनसेवा. ◾ख्यातनाम कलाकारांसोबत स्थानिक कलाकारांनाही श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे हक्काचे व्यासपीठ.

स्वरपंढरी”तून स्थानिक गुणवंत कलाकारांची विठुरायाच्या चरणी सुरेल गायनसेवा.  ◾ख्यातनाम कलाकारांसोबत स्थानिक कलाकारांनाही श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे हक्काचे व्यासपीठ.


-------------------------------------------------------------------------
पंढरपूर, दि. : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने दि. 21. रोजी आयोजित श्री गणेशोत्सव संगीत महोत्सवाच्या चौथ्या दिवशी “स्वरपंढरी” या कार्यक्रमातून पंढरपूरमधील स्थानिक गुणवंत कलाकारांनी आपली गायनसेवा विठुरायाच्या चरणी समर्पित केली.

सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सन्माननीय सदस्य, कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव व व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या संगीत महोत्सवात स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे सल्लागार समितीचे सदस्य ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम व मान्यवर कलाकारांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सहभागी सर्व कलाकारांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मोहन देवकते, अश्विनी जोशी, शुभांगी लोखंडे आणि सलीम वडगावकर यांच्या सुरेल गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. “तू सुखकर्ता तू दुःखहर्ता”, “शोधीशी मानवा राऊळी मंदिरी”, “माझे माहेर पंढरी”, “भाजे रे मुरलीच्या बाजे”, “सांज ए गोकुळी”, “टाळ बोले चिपळीला”, “मेहंदीच्या पानावर” आदी गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली. “सजन नयन” या सुरेल भैरवीने मैफिलीची सांगता झाली.

कलाकारांना तबला – गणेश गोडबोले, सिंथेसायझर – सतीश कुलकर्णी, गिटार – यश कुलकर्णी, ऑक्टोपॅड – राजू बेले, ढोलक – बालाजी जानकर यांनी सुरेल साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन संदीप पिटके व आसावरी कुलकर्णी यांनी केले.

या कार्यक्रमाला पंढरपूरमधील कलारसिकांची मोठी गर्दी झाली. स्थानिक कलाकारांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत कार्यक्रमाचा आनंद लुटला.

दरम्यान, दि. २२ व २३ सप्टेंबर रोजी संगीत महोत्सवाच्या पुढील दोन दिवसांत ख्यातनाम गायक-गायिकांची गायनसेवा विठुरायाच्या चरणी समर्पित होणार आहे. या कार्यक्रमांचा कलारसिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने करण्यात आले आहे.