कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे समाजपरिवर्तन गौरव पुरस्कार सोहळा संपन्न..

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे समाजपरिवर्तन गौरव पुरस्कार सोहळा संपन्न..

___________________________________________________

बार्शी -(दै.पंढरी नगरी न्यूज ) येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेचे संस्थापक, संवर्धक व प्रेरणास्त्रोत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त संस्थेच्या वतीने बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५ रोजी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे समाजपरिवर्तन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. पदमविभूषण प्रो. रघुनाथ माशेलकर व पदमविभूषण प्रो. अनिल काकोडकर हे यावर्षीच्या पुरस्काराचे मानकरी होते. राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या शुभहस्ते व अध्यक्षस्थानी हा सोहळा पार पडला. 

यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी वाय यादव, उपाध्यक्ष नंदनजी जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी टी पाटील, सहसचिव ए पी देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पदमविभूषण प्रो. अनिल काकोडकर यांनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल संस्थेचे आभार व्यक्त केले.ते म्हणाले, " मामासाहेबांचे शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात महान कार्य केले आहे. मामासाहेबांनी तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय केली. समाजाच्या सर्व स्तरावर सुधारणा करण्याचे कार्य केले. तंत्रज्ञानाने साक्षरता निर्माण होते. नवनिर्मिती करता येते. तंत्रज्ञान आत्मसात केल्याने सक्षमता येते. सक्षम नवी पिढी घडविणे गरजेचे आहे. समाजाला पुढे नेणारी व शोषण मुक्त करणारी व्यवस्था निर्माण करावी. तंत्रज्ञान कसे राबवायचे याची स्वायत्तता अबाधित राखा असे आवाहन त्यांनी केले."

पदमविभूषण प्रो. रघुनाथ माशेलकर यांनी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे ऋण व्यक्त केले. ते म्हणाले, "मामासाहेबांनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचवली. मामांनी समतेचा विचार मांडला. मामांनी समाजपरिवर्तनाचे पवित्र कार्य केले. स्त्री शिक्षण, शेतकरी, आर्थिक स्वावलंबन,अंधश्रद्धा निर्मूलन यावर मामांनी भर दिला. संस्थेने सर्वच क्षेत्रांत प्रगती केली आहे. संस्थेचे स्वतंत्र विद्यापीठ असावे. सध्या शिक्षणाला मर्यादा राहिली नाही. जे तंत्रज्ञान गरिबांसाठी विकसित केले जाते ते महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले."

राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी अध्यक्षीय समारोप केला. ते म्हणाले," पुरस्कारथींचे कर्तुत्व महान आहे. मामांनी वसतीगृहातून शैक्षणिक कार्य सुरू केले. गावचा विकास साधण्यात शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. सामाजिक सुधारणेत अनेक घटकांचे योगदान गरजेचे आहे. शिक्षणातून आदर- सन्मान करण्याचे संस्कार केले पाहिजेत. समाज व देशाप्रती आत्मीयता जोपासली पाहिजे. शिक्षणातून स्वावलंबनाचे धडे दिले पाहिजेत असे त्यांनी सांगितले."

संस्थेचे अध्यक्ष डॉ .बी वाय यादव यांनी स्वागतपर संबोधनात संस्थेचा इतिहास व पुरस्काराची माहिती विशद केली. संस्थेचे जनरल सेक्रेटरी पी. टी पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पुरस्काराच्या सन्मानपत्राचे वाचन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. उपस्थितांचे आभार संस्थेचे खजिनदार तथा सांस्कृतिक चेअरमन जयकुमार शितोळे यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात व सांगता राष्ट्रगीताने झाली.