पंढरपूर चैत्री वारीत तीन लाख बुंदी लाडू प्रसाद व 50 हजार राजगिरा लाडू प्रसादाची उपलब्धी; - कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके.

पंढरपूर चैत्री वारीत तीन लाख बुंदी लाडू प्रसाद व 50 हजार राजगिरा लाडू प्रसादाची उपलब्धी; - कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके.

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) श्री क्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री अशा चार प्रमुख यात्रा पार पडतात. त्यामध्ये तुलनेने संख्यात्मक दृष्ट्या कमी असणारी चैत्र यात्रा शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी संपन्न होत आहे. या यात्रेला पंढरपूर शहरात सुमारे दोन ते तीन लाख भाविक असतात.

या भाविकांना श्री चा प्रसाद म्हणून अल्पमुल्य देणगी आकारून बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येतो. या वारीला सुमारे तीन लक्ष बुंदी लाडू प्रसाद व पन्नास हजार राजगिरा लाडू प्रसादाची उपलब्धी असणार आहे. त्यामध्ये बुंदी लाडू प्रसाद मंदिर समिती मार्फत आवश्यक कच्चा माल खरेदी करून एमटीडीसी भक्त निवास येथील लाडू उत्पादन केंद्रांमध्ये तयार करण्यात येतो. तसेच राजगिरा लाडू प्रसाद हा आऊटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके यांनी दिली.

वारीला येणारा प्रत्येक भाविक हा लाडू प्रसाद खरेदी करत असतो आणि या भाविकांना पुरेशा प्रमाणात लाडू प्रसाद उपलब्ध व्हावा असे नियोजन मंदिर समितीमार्फत करण्यात आले असून, या कामाची जबाबदारी अनुभवी विभाग प्रमुख श्री पृथ्वीराज राऊत यांना देण्यात आली आहे.

मंदिर परिसरात पश्चिम द्वार व उत्तर द्वार येथे कायमस्वरूपी लाडू स्टॉल उभा करण्यात आले असून, सदरचे स्टॉल सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. बुंदी लाडू प्रसादासाठी चांगल्या दर्जाची कोरडी हरभरा डाळ, डबल रिफाइंड शेंगदाणा तेल, बेदाणा, काजू, वेलदोडे, रंग, सुपर एस साखर इत्यादी घटक पदार्थाचा व पॅकिंग साठी पर्यावरण पूरक कागदी पिशवीचा वापर करण्यात येत आहे. या बुंदी लाडू प्रसादासाठी सुमारे 50 कर्मचारी/ स्वयंसेवक सेवा देत असून, अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती करण्यात येत आहे.