सायबर वॉरियर्सची शाळेत धडक; विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणुकीपासून बचावाचे मार्गदर्शन

सायबर वॉरियर्सची शाळेत धडक; विद्यार्थ्यांना ऑनलाइन  फसवणुकीपासून बचावाचे मार्गदर्शन

-----------------------------------------------------

जामनेर :(दै.पंढरी नगरी न्यूज) वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन जगातील संभाव्य धोक्यांची माहिती देण्यासाठी इंदिराबाई ललवाने ज्युनियर स्कूल, जामनेरपुरा येथे सायबर अवेअरनेस सेशन घेण्यात आले. विद्यार्थ्यांना सुरक्षित इंटरनेट वापराचे नियम आणि ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या सत्रात जान्हवी सपकाळे, वैष्णवी सैतवाल, साक्षी पाटील, विद्या सोनवने, राहुल चोपडे आणि जय ठाकूर या सायबर वॉरियर्सनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विविध प्रकारचे ऑनलाइन स्कॅम कसे घडतात, फसवणूक करणारे व्यक्ती कोणत्या पद्धतींचा वापर करतात आणि अशा परिस्थितीत काय काळजी घ्यावी, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमात Quick Field Foundation कडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सायबर अवेअरनेस बुकलेट्सचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. बुकलेट्समधील माहिती विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचावी आणि त्यातील नियम आपल्या दैनंदिन जीवनात वापरावेत, यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या कॉल किंवा मेसेजवर तातडीने विश्वास न ठेवणे, OTP, PIN आणि पासवर्ड कोणालाही न सांगणे, संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे आणि ऑनलाइन व्यवहार करताना विशेष खबरदारी घेणे याबाबत सूचना देण्यात आल्या.

प्राचार्य गायकवाड सर यांच्या सहकार्याने आणि आर. बी. आमले सरांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत सायबर सुरक्षेबाबत आपले प्रश्न मांडले. विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य माहिती मिळाल्यास अनेक सायबर फसवणुकींपासून त्यांचे संरक्षण होऊ शकते, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.