विशाल भोपळे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार’ ◾ मंगळवेढा येथील ज्ञानदीप शिक्षण संकुलनातील शिक्षकाचे कौतुक.
-------------------------------------------------------------------------
मंगळवेढा ,(दै.पंढरी नगरी न्यूज) :- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय व समर्पित कार्य करणारे ज्ञानदीप शिक्षण संकुलातील क्रीडा शिक्षक विशाल भोपळे यांना स्वेरी कॉलेज, पंढरपूर यांच्या वतीने ‘ज्ञानयात्री आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्यात स्वेरीज कॉलेज, पंढरपूरचे संस्थापक अध्यक्ष रोंगे सर यांच्या हस्ते विशाल भोपळे यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि जिद्द निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विशाल भोपळे यांनी विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण देत त्यांच्या क्रीडागुणांना योग्य दिशा दिली आहे. विविध शालेय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांची सातत्याने तयारी करून घेत त्यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रेरित केले. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत ज्ञानदीप शिक्षण संकुलाचे नाव उज्ज्वल केले आहे.
या पुरस्कार वितरण प्रसंगी ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी सलगर, संस्थेचे सचिव सिद्धेश्वर सलगर, ज्ञानदीप मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका अर्चना सलगर, ज्ञानदीप इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका रेश्मा शेख, ज्यु. कॉलेजचे प्राचार्य बाळासाहेब भोरकडे, ह.भ.प. प्रा. विश्वनाथ ढेपे, महेश ढेकळे, सुभाष कुंभार, संतोष सोनवले, अकिब मुजावर, मंगेश ढेपे यांच्यासह ज्ञानदीप शिक्षण संकुलातील शिक्षकवर्ग उपस्थित होते. विशाल भोपळे हे पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील रहिवासी आहेत
विशाल भोपळे यांच्या या सन्मानाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव देत त्यांना यशाच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या विशाल भोपळे यांच्या कार्याचा ‘ज्ञानयात्री आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार’ हा गौरव ज्ञानदीप शिक्षण संकुलासाठी अभिमानाचा आणि संपूर्ण शिक्षकवर्गासाठी प्रेरणादायी ठरला आहे.