सोलापूरचे शिक्षण अधिकारी किरण लोहार यांच्यावर लाच लुचपत विभागाची कारवाई!
____________________________________________________
किरण लोहार यांच्या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ
____________________________________________________
सोलापूर; पंढरी- नगरी न्यूज : सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर अखेर कारवाईचा हातोडा पडला असून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २५ हजार रुपये घेताना रंगेहात पकडले असल्याची माहिती समोर आली आहे. किरण लोहार यांच्या सोबतच प्राथमिक शिक्षण विभागातील एका लिपिकास चौकशी करिता ताब्यात घेण्यात आले आहे.
किरण लोहार यांना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा पदभार घेऊन साधारण १३ महिने झाले होते मात्र त्यांच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे कामकाज पाहिले तर कायमच वादग्रस्त राहिले आहे. कोणतीही फाईल वजन ठेवल्याशिवाय पुढे सरकत नव्हती अशा तक्रारी वारंवार ऐकण्यास मिळत होत्या.
शेवटी त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा हातोडा पडलाच. या प्रकरणातील तक्रारदार यांची उत्तर सोलापूर तालुक्यात एक स्वयं अर्थसहाय्य शाळा आहे. त्यांना वर्ग वाढीसाठी यूडायस या प्रणालीत नोंदणी करून प्रस्ताव पुढे पाठवण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी यांनी २५००० देण्याचे ठरले मात्र तक्रारदार यांनी अँटी करप्शन विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. सोमवारी जिल्हा परिषदेच्या त्यांच्या कार्यालयात ५ वाजून ४५ मिनिटांनी त्यांना २५००० घेतल्याचे रंगेहात पकडण्यात आले आहे.