‘ श्री विठ्ठल मंदिरात 'करावा विठ्ठल’च्या सुरेल अभंगांनी रसिक तल्लीन. ◼️आकार पुणे निर्मित संगीत-नाट्य कलाकृतीने पंढरीच्या वारीच्या रंजक आठवणींना उजाळा.

‘ श्री विठ्ठल मंदिरात 'करावा विठ्ठल’च्या सुरेल अभंगांनी रसिक तल्लीन.  ◼️आकार पुणे निर्मित संगीत-नाट्य कलाकृतीने पंढरीच्या वारीच्या रंजक आठवणींना उजाळा.


---------------------------------------------------------------------------
पंढरपूर, (दै.पंढरी नगरी न्यूज):- : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने दि. 20 रोजी आयोजित श्री गणेशोत्सव संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ‘आकार’ पुणे निर्मित ‘करावा विठ्ठल’ या संगीत व नाट्य कलाकृतीने पंढरपूरकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. पंढरीची वारी, वारकऱ्यांचे अनुभव, भक्तीभाव आणि सुरेल अभंग यांची सुंदर सांगड घालत कलाकारांनी विठ्ठल चरणी आपली कलासेवा अर्पण केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदिर समितीचे सदस्य सद्गुरू श्री. भास्करगिरी महाराज, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम तसेच मान्यवर कलाकारांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सहभागी सर्व कलाकारांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

‘करावा विठ्ठल’ या कलाकृतीतून पंढरीच्या वारीतील रंजक कथा, वारकऱ्यांचा आनंद, वारीतील भक्तिभाव आणि विठ्ठलनामाचा गजर यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. संगीत, अभिनय, कथन आणि अभंग यांच्या सुरेल मिलाफातून कलाकारांनी रसिकांना वारीचा प्रत्यक्ष अनुभव देण्याचा प्रयत्न केला.

या कार्यक्रमात आकार ग्रुपच्या १४ कलाकारांनी सहभाग घेतला. त्यामध्ये महेश पाटणकर, धनंजय वेर्णेकर, स्वाती रांजेकर, सविता पेशवे, यशश्री पुणेकर, रूपाली बापट, अनहिता रांजेकर तसेच मृदंग – अविनाश तिकोनकर, तबला – जितेंद्र पावगे, हार्मोनियम – माधवी करंदीकर आदी कलाकारांचा सहभाग होता.

तिसऱ्या दिवशी पंढरपूरातील कलारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अविस्मरणीय संगीत मैफिलीचा आनंद घेतला.

पुढील २१, २२ व २३ सप्टेंबर रोजी महोत्सवात मान्यवर व ख्यातनाम गायक-गायिकांची गायनसेवा सादर होणार आहे. या संगीत महोत्सवाचा कलारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने करण्यात आले आहे.