पंढरपूरात नवरात्र महोत्सवानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार. ◾रुक्मिणी मातेला मारवाडी/लमाणी पोशाख भाविकांची दर्शनासाठी गर्दी.
---------------------------------------------------------------------------
पंढरपूर, (दै.पंढरी नगरी न्यूज): नवरात्र महोत्सवानिमित्त श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री विठ्ठल - रुक्मिणी माता व परिवार देवतांना पारंपरिक पोशाखासह विविध अलंकार परिधान करण्यात आले आहेत. रुक्मिणी मातेला पारंपरिक लमाणी पोशाख परिधान करण्यात आला असून, अलंकारांनी सजलेल्या श्रींच्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
रुक्मिणी मातेला चिंचपेटी, हिरवी तनमई, भोर, झेला, दशावतारी हार, ठुशी, सोन्या-मोत्यांचे ताणवड, मोत्याचा कंठा, बाजीराव गरसोळी, मोत्याच्या पाटल्या, सोन्याचे बाजूबंद, रुळजोड, पैंजण, वाक्या, कंबरपट्टा व पुतळ्याची माळ असे पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत.
श्री विठ्ठलाला सोन्याचा मुकुट, बालाजी नाम, कौस्तुभ मणी, शिरपेच, मत्स्यजोड, तोडे, तीन पदरी तुळशीमाळ, तीन पदरी मोहनमाळ, अष्टपैलू मण्यांची कंठी, पुतळ्याची माळ, मोहरांची माळ, चांदीचा मत्स्य व हिऱ्यांचे कंगन परिधान करण्यात आले आहेत.
महालक्ष्मी मातेला सोन्याचे गंठण, मोत्याची कंठी, जनक-जनक हार, सूर्यकळ्यांचा हार, लक्ष्मीहार व चांदीची छत्री; सत्यभामा देवीला सिद्धेश्वर टॉप, जवेची माळ, तांबडी चिंचपेटी, पुतळ्यांची माळ, हायकोल व ठुशी; तर राधिका मातेला लक्ष्मी टॉप, मोहरांची माळ, जवेची माळ, लक्ष्मीहार व जवमणी पदक परिधान करण्यात आले आहे. श्री व्यंकटेशाला सोन्याचा टॉप, एकदानी, जवेची माळ, तुळशीमाळ व अष्टपैलू मण्यांची कंठी परिधान करण्यात आली आहे.
मंदिर समितीच्या अखत्यारीतील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लमादेवी व यमाई-तुकाई माता आदी परिवार देवतांनाही पारंपरिक पोशाख करण्यात आला असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली.
श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर व सर्व सन्माननीय सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवालाही प्रारंभ झाला आहे. अलंकारांचे दर्शन घेण्यासाठी महिला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी सांगितले.