पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्वच मुलांना मिळणार यंदा मोफत गणवेश - शिक्षण अधिकारी संजय जावीर यांची माहिती

पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्वच मुलांना मिळणार यंदा मोफत गणवेश - शिक्षण अधिकारी संजय जावीर यांची माहिती

------------------------------------------------------------------------------------

सोलापूर (पंढरी नगरी न्यूज) ; सोलापूर जिल्हा परिषद, महापालिका नगरपालिका, अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.बालवयात मुलांच्या मनात एकमेकांबद्दल जातीय भेदभाव निर्माण होऊ नये, यासाठी राज्य शासनाने तसा निर्णय घेतला आहे.

यंदा सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांना यावर्षी गणवेश मिळतील. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या माध्यमातून त्यावर कार्यवाही केली जात आहे.

शिलाई काम करणाऱ्यांना मोठी संधी

सोलापूरसह राज्यभरातील जवळपास ७० लाख विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात मोफत गणवेश मिळणार आहेत. त्यासाठी राज्य सरकाला प्रत्येकी ६०० रुपयांप्रमाणे अंदाजे ४२३ कोटी रुपयांचा निधी द्यावा लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तो निधी संबंधित शाळांच्या शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग केला जातो. गणवेशाचा रंग व कापड निश्चित करून शाळा व्यवस्थापन समिती गणवेश शिलाई करून घेते आणि शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुलांना त्याचे वाटप होते. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास पावणेतीन लाख विद्यार्थी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेतात. त्यातून शिलाई काम करणाऱ्यांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे.

'संभाजी ब्रिगेड'च्या मागणीला यश

सकाळने वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्याची दखल संभाजी ब्रिगेडने घेतली आणि शहराध्यक्ष श्याम कदम यांनी मुख्यमंत्र्यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. ठरावीक मुलांनाच मोफत गणवेश मिळत असल्याने शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांच्या मनात जातीसंदर्भात भेदभावाची भावना निर्माण होत असल्याचेही त्या निवेदनातून सांगण्यात आले होते.