पंढरपूर आषाढीवारी साठी भाविकांना रेल्वे प्रशासनाकडून 150 रेल्वे गाड्यांची सोय ◼️ सोलापूर विभागाकडून विठ्ठल भक्तासाठी माहिती

पंढरपूर आषाढीवारी साठी भाविकांना रेल्वे प्रशासनाकडून 150 रेल्वे गाड्यांची सोय   ◼️ सोलापूर विभागाकडून विठ्ठल भक्तासाठी माहिती

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीकडे कूच करणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांचा प्रवास अधिक सुकर करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे.यंदा मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून 20 ते 29 जुलै 2026 या कालावधीत 150 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या 137 फेऱ्यांच्या तुलनेत यंदा प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन फेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. या विशेष नियोजनामुळे विदर्भ, खान्देश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

‘या’ प्रमुख शहरांतून सुटणार गाड्या

भाविकांना थेट आणि विनासायास पंढरपूर गाठता यावे, यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून गाड्यांचे जाळे विणण्यात आले आहे.

मुंबई आणि पुणे, नागपूर आणि न्यू अमरावती, खामगाव आणि भुसावळ, जळगाव, लातूर आणि कोल्हापूर मिरज, सोलापूर, कुर्डुवाडी, परळी आणि परभणी प्रवाशांच्या सुविधेसाठी पंढरपूर स्थानकाचा कायापालट

पंढरपूर रेल्वे स्थानकावर वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने यंदा चोख व्यवस्था केली आहे. प्रवाशांना ऊन आणि पावसापासून वाचवण्यासाठी स्थानकावर एक मोठे निवारा शेड उभारण्यात आले आहे, जिथे हजारो भाविक आरामात विश्रांती घेऊ शकतील. याशिवाय, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय आणि जागोजागी स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि गर्दी टाळण्यासाठी स्थानकावर येण्याचे आणि जाण्याचे मार्ग वेगळे करण्यात आले आहेत. तसेच, आणीबाणीच्या प्रसंगासाठी 24 तास वैद्यकीय पथक आणि ॲम्ब्युलन्सची सेवाही तैनात असेल. Special Trains Forतिकीट बुकिंग कशी करावी?

या विशेष गाड्यांचे तिकीट काढणे अतिशय सोपे आहे. तुम्ही आरक्षित डब्यांचे तिकीट आयआरसीटीसीच्या (IRCTC) अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवरून घरी बसल्या बुक करू शकता. तसेच रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर जाऊनही तुम्हाला तिकीट घेता येईल. ज्या प्रवाशांना जनरल डब्याने प्रवास करायचा आहे, ते रेल्वे स्थानकावरील जनरल तिकीट खिडकीवरून किंवा रेल्वेच्या ‘UTS’ मोबाईल ॲपचा वापर करून विना रांगेत तिकीट काढू शकतात. लाखो भाविकांचा हा भक्तीचा प्रवास सुरक्षित, स्वस्त आणि सुखाचा व्हावा, यासाठी संपूर्ण रेल्वे यंत्रणा पूर्ण ताकदीने कार्यरत असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.