सोलापुरात गावठी पिस्टलसह तरुणास अटक; ◼️ ५.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५.५० लाखांची रोख रक्कम हस्तगत

सोलापुरात गावठी पिस्टलसह तरुणास अटक;   ◼️ ५.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५.५० लाखांची रोख रक्कम हस्तगत

------------------------------------------------------------------------------------

सोलापूर (दै.पंढरी नगरी न्यूज) सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत गावठी पिस्टल, पाच जिवंत काडतुसे आणि साडेपाच लाखांची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार फरार आहे.

१५ जुलै रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, नितीन नगर परिसरातील कोंडयाल शाळेमागे एक तरुण स्पोर्ट्स बॅगमध्ये गावठी पिस्टल घेऊन येणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या पथकाने तात्काळ सापळा रचला.

रात्री सुमारे ८ वाजून १६ मिनिटांनी पोलिसांनी रोहित रघुनाथ अहिरे या २० वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची झडती घेतली असता एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल, पाच जिवंत काडतुसे आणि ५ लाख ५० हजार रुपयांची रोकड असा एकूण ५ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चौकशीत आरोपीकडे शस्त्राचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच हा मुद्देमाल त्याचा मित्र प्रदीप हुसेनी गायकवाड याने काही दिवसांपूर्वी ठेवण्यासाठी दिल्याची कबुली आरोपीने दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी रोहित अहिरेला अटक करण्यात आली असून, या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रदीप हुसेनी गायकवाड सध्या फरार आहे. त्याचा पोलीस शोध घेत असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.