माजी विद्यार्थ्यांमध्ये शाळा व शिक्षक यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना कौतुकास्पद - गट शिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे

माजी विद्यार्थ्यांमध्ये शाळा व शिक्षक यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना कौतुकास्पद - गट शिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे

------------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा(दै.पंढरी नगरी न्यूज) : मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथील जिल्हा परिषद शाळेतील माजी विद्यार्थी मित्र परिवार यांनी शिक्षक व शाळेबद्दल कृतज्ञतेची भावना तब्बल ३० वर्षानंतरही जपून स्नेह संवाद कार्यक्रमाच्या निमित्त ज्या उद्देशाने एकत्र आले आहेत.तो विचार आणि आपलेपणा हा आपुलकीने जपा असे आवाहन दक्षिण सोलापूरचे गट शिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे यांनी केले.
   
भोसे ता.मंगळवेढा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व इंग्लिश स्कूल मधील सन १९८६ च्या बॕचच्या माजी विद्यार्थी मित्र परिवार यांनी आयोजित स्नेह संवाद २०२३ या कार्यक्रम प्रसंगी गट शिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे हे बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्लिश स्कूल भोसेचे सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव भगरे हे होते.यावेळी जि.प.प्रा.अकोलेचे सहशिक्षक विजय झिंजुरटे , माजी प्राचार्य एस. बी. गायकवाड , एल.एन.नागणे , एस.एम.पाटील ,निंगप्पा बिराजदार यांच्यासह माजी  विद्यार्थी - विद्यार्थीनी उपस्थित होते.पुढे बोलताना गट शिक्षणाधिकारी बनसोडे म्हणाले , ज्या शाळेत नोकरीला लागलो.आज त्याच शाळेत तब्बल ३० वर्षानंतर पहिल्या बॕचमधील माजी विद्यार्थ्यांना भेटण्याचा आणि शाळा पाहण्याचा योग हा भाग्यदायी आहे.
 
अध्यक्षीय भाषणात शिवाजीराव भगरे यांनी भोसे शाळा ही शिक्षक यांची पुण्य आणि कर्मभूमी आहे.आज त्याच शाळेत माजी विद्यार्थी यांनी स्नेह मेळावा आयोजित करुन शाळा, शिक्षक , मित्र यांच्याबद्दल स्नेह आपुलकी जपणारा आहेच शिवाय शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील नाते दृढ करणारा आहे याबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी सहशिक्षक विजय झिंजुरटे , एस.बी.गायकवाड , निंगप्पा बिराजदार , एल.एन नागणे यांनीही मार्गदर्शन केले.शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते.ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे सत्य आहे.याच पार्श्वभूमीवर भोसे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व इंग्लिश स्कूल येथे सन १९८६ ते ९६ या कालावधीत शिकलेल्या माजी विद्यार्थी पुन्‍हा एकत्र आले आणि स्नेह संवादाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  
यावेळी शहिद सुधीर घाडगे स्मारक भेट व पुष्पहार अर्पण करणे , निधन झालेल्या मित्रांना श्रद्धांजली अर्पण करणे , विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ,  प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांचा सत्कार , स्नेह संवाद २०२३ स्मरणिकेचे प्रकाशन , वृक्षारोपण उपक्रम घेण्यात आले.

या कार्यक्रमासाठी शाळेचे माजी विद्यार्थी सचिन तटाळे , सचिन सोनवणे , मारुती बनसोडे , नंदकुमार खडतरे , सचिन काळे, हिम्मत घाडगे, सावकर भुसे , नागनाथ घाडगे , अनिल गंगधरे , सुनिता काकडे , मिनाक्षी आवळेकर , सुनिता दुधाळ आदींनी पुढाकार घेऊन सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी जवळजवळ २८ वर्षांनंतर एकमेकांना भेटले.त्यामुळे अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला.अनेकांना आपले शाळेचे जुने मित्र- मैत्रिणी भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता तर अनेकांनी ही भेट आणि या आठवणी पुढील आयुष्यभर प्रेरणा आणि उत्साह देत राहतील अशा प्रकारे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.

{ स्नेह संवाद २०२३ या कार्यक्रम प्रसंगी माजी विद्यार्थी जयकुमार माने या विद्यार्थ्यांने हाफ शर्ट व खाकी पँट हा शालेय गणवेश परिधान करुन कार्यक्रमाला उपस्थित राहून उपस्थितांचे चांगलेच लक्ष वेधले आणि सर्व माजी विद्यार्थी आपल्या शालेय जीवनात हरवून गेले.}