तीर्थक्षेत्र विठुरायाच्या पंढरपूरात मटक्यातून महिन्याला ५ कोटींची उलाढाल

तीर्थक्षेत्र विठुरायाच्या पंढरपूरात मटक्यातून महिन्याला ५ कोटींची उलाढाल

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज) महाराष्ट्राची अध्यात्मिक नगरी समजल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्राच्या विठुरायाच्या पंढरपुरात औद्योगिक विकासाअभावी आधीच बकाल झालेल्या पंढरपूरात गल्ली-बोळात सर्वत्र मटका-जुगाराचे जाळे पसरलेले आहे. हे जाळे एखाद्या मल्टिनॅशनल कंपन्यांच्या जाळ्यांनाही लाजविणारे आहे.या मटका धंद्यामुळे मजुरी करणाऱ्या असंख्य श्रमिकांचे व कामगारांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पोलिस अधून-मधून मटका टपऱ्यांवर कारवाई करतात, त्यानंतर 'पुन्हा येरे माझ्या मागल्या'ची अवस्था होते.

या शहर परिसरात खाकी वर्दीकडूनच मटका 'ओपन' झाल्याचं मानलं जातंय. 'ओपन', 'क्लोज' अन् 'पाना'त हजारो जणांचे संसार उद्ध्वस्त होताहेत. साधारण महिन्याला ५ कोटीहून अधिक रक्कम पंढरपूररांच्या खिशातून जातेय, एवढा फटका बसतोय.हा आकडा कमीअधिक होऊ शकतो.मटका किंगवाल्यांना नगरसेवकपदाची भुरळ पाण्यावर मलई काढण्याच्या धंद्यातून गबरगंड झालेल्या मटका किंगवाल्यांना आता जणू आकाश ठेंगणे झाले आहे. मटक्यात पुढारपण करता करता त्यांना आता नेता बनून लोकांचे पुढारपण करायचे आहे. त्यातून वेगवेगळ्या निमित्ताने हे मटका किंग आपले फोटोंचे फ्लेक्स् झळकवत आहेत.  शिवजयंतीला मोठी मिरवणूक काढून स्वत:चे नाव मोठे करण्यासह सर्वांना मटक्याच्या मलईचा 'प्रसाद' वाटणारा मटका किंग अशीच ती काही नावे आहेत. ज्यांना आता नगरपालिकेच्या नगरसेवकपदाचे सिंहासन भूरळ घालीत असावे.त्यामुळे मटका क्षेत्रात उपलब्ध असलेल्या व पूर्वी लागून गेलेल्या आकड्यांचा चार्ट पाहून गणिती तज्ज्ञाच्या थाटात आकडेमोड करून असंख्य मटकाबहाद्दर आकडे लावत असतात. परंतु सहजासहजी लागत नाही मटका, त्यातून लावणाऱ्यांच्या खिशाला बसतोय फटका. 'ओपन' जेऊ देईना व 'क्लोज' झोपू देईना, अशी अवस्था असलेल्या व मटक्याचे व्यसन लागलेल्या असंख्य लोकांचे संसार त्यामुळे उद्ध्वस्त झाले. परंतु आपले उखळ पांढरे करून घेण्यात रमलेल्या राजकीय नेत्यांना व पोलिसांना त्याबद्दल 'ना खंत ना खेद'!

लुटुपुटू अन् मॅनेज कारवाई !

वरिष्ठांकडून आदेश आल्यावर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना मटका धंद्यांवर धाडी घालाव्या लागतात. अशावेळी पोलिस निरीक्षकांचा वसूलदार त्या भागातील स्थानिक 'मटका किंग'ला गाठून आम्हाला मटक्याच्या १५ केसेस हव्या असल्याचे सांगतो.

अर्थात या केसेसचे प्रमाण कमी-जास्त असू शकते. तो मटका किंग हा संदेश मटका बुकींना पाठवितो. त्यानंतर मटका केंद्रावरील मोठी रक्कम 'मटका किंग'कडे पाठविली जाते. त्यानंतर एक-एक पोलिस मटका केंद्रावर जातो. येथील मटका घेणारा बुकी आपण होऊन नाममात्र रक्कम व आकड्यांच्या चिठ्ठ्यांसह स्वतःला पोलिसांच्या हवाली करतात. त्यांना कोर्टात उभे केल्यानंतर 'मटका किंग' त्यांच्या वकिलाची सोय करतो व त्यांना जामिनावर सोडवून आणतो.

क्वचितप्रसंगी अधिक हप्त्यासाठी पोलिस अधिकारी आपल्या पोलिसांकरवी छापे घालतात. याशिवाय, पोलिस खात्यातील अंतर्गत राजकारणातून एखाद्या पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याला हैराण करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी परस्पर मटका बुकींवर छापे घालतात. हे वास्तव असल्याचा बोलबाला आहे. कोणत्याही कारणाने का होईना, मटका बुकींवर छापे घातल्यानंतर पोलिस फक्त मटका घेणाऱ्या बुकींवर कारवाई करतात, स्थानिक मटका किंगपर्यंत सहसा पोचत नाहीत. त्याला अपवाद आहे भाजपचा एक माजी नगरसेवक व कुप्रसिद्ध 'मटका किंग'.