रेशनकार्ड एकाचे नंबर मात्र दुसऱ्याचा..पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकांची चतुर अशी बनवाबनवी... पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे हजारो कुटुंबे विविध योजनांपासून राहत आहेत वंचित

रेशनकार्ड एकाचे नंबर मात्र दुसऱ्याचा..पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकांची  चतुर अशी बनवाबनवी...  पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे हजारो कुटुंबे विविध योजनांपासून राहत आहेत वंचित

-------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्युज ) राज्यातील प्रत्येक कुटुंबासाठी रेशन कार्ड नंबर हा महत्त्वाचा असतो. कारण शासनाच्या नवीन नियमानुसार रेशन कार्ड नंबरवरतीच रेशन कार्ड धारकांची नावे व माहिती अपलोड केलेले असते.तसेच हाच नंबर त्या कुटुंबाची ओळख असते. यासोबतच उज्वला गॅस योजनेसह इतर सवलतीत गॅस योजनेचा लाभ घेण्यासाठीही याच रेशन कार्ड नंबर चा वापर करावा लागतो. मात्र पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील एका कुटुंबाला त्यांच्या रेशन कार्डवरती दुसऱ्याच व्यक्तीचा रेशन कार्ड नंबर देऊन कार्ड ऑनलाइन केल्याचा प्रकार पुरवठा विभागाकडून करण्यात आलेला आहे.

याबाबत अनेकदा हेलपाटे मारूनही पुरवठा निरीक्षक व कार्यालयातील कर्मचारी हे प्रतिसाद देत नसल्याचे सदर कुटुंबीयांचे म्हणणे आहे.सिद्धेवाडी येथील आशा बंडू जाधव यांची शिधापत्रिका पुरवठा विभागाकडून ऑनलाइन करण्यात आली आहे. त्या शिधापत्रिकेवर दस्तुरखुद्द संबंधित पुरवठा अधिकारी यांनीच तुमची कार्ड ऑनलाइन झाले असून त्याचा (आरसी क्रमांक 27 20 23 45 79 54 )हा देण्यात आल्याचे सांगितले.

संबंधित महिला ह्या उज्वला गॅस योजनेचा लाभ घेण्यासाठी गेल्या असता त्यांच्या शिधापत्रिकेवर दुसऱ्याच शिधापत्रिका धारकांचा( आरसी नंबर क्रमांक) दिसून आला .सदर महिला या पुरवठा विभागाकडे गेले असता संबंधित कर्मचाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे.मात्र एका व्यक्तीच्या रेशन कार्डवर दुसऱ्याचा नंबर कसा काय दिला गेला हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहे.

एकीकडे पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे गेल्या वर्षभरात पंढरपूर तालुक्यातील चालू अवस्थेत असलेली हजारो रेशन कार्ड बंद पडलेली आहेत.त्यांच्या ऑनलाईन नोंदी पुसून गेलेल्या आहेत.त्यामुळे त्या हजारो कुटुंबांना केंद्र व राज्य सरकारच्यावतीने दिल्या जाणाऱ्या अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.अशी बंद पडलेली रेशन कार्ड ऑनलाइन करून ती पुन्हा चालू करावी लागत आहेत. मात्र ही सोय पंढरपूर पुरवठा विभागाच्यावतीने योग्य वेळी मिळत नसल्याने गोरगरीब व अडाणी लोकांना खाजगी ऑनलाईन सेंटरकडून शेकडो रुपये खर्च करून रेशन कार्ड ऑनलाइन करून घ्यावी लागत आहेत.

तर दुसरीकडे पुरवठा विभागाकडे कार्डधारकांची ऑनलाईन नोंदणीसाठी मागील महिन्यापासून कागदपत्रे देऊन सुद्धा पुरवठा विभागातील कर्मचारी हे ऑनलाइन नोंदणीला विलंब करीत असल्याने विशेषता महिला वर्गाची पुरवठा कार्यालयाकडून हेळसांड होताना दिसून येत आहे. सदरहू कामचुकार संबंधित पुरवठा निरीक्षकाची  वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करून त्वरित कारवाई करण्याची मागणी पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांतून होत आहे.