चैत्री एकादशी निमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणीमातेची नित्य पूजा संपन्न..
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) चैत्री शुद्ध कामदा एकादशी निमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची नित्यपूजा संपन्न झाली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांनी, तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प प्रकाश महाराज जंवजाळ यांनी केली.
वारकरी संप्रदायातील महत्त्वाची वारीपैकी चैत्री वारीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गर्भगृहाचे संवर्धन करण्याचे काम सुरू असल्याने भाविकांना मुख दर्शन सुरु ठेवण्यात आले आहे. चैत्री एकादशीला भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदीर समितीच्यावतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून, समितीच्या वतीने दर्शनरांगेत व दर्शन मंडपात, शुध्द पिण्याचे पाणी, शौचालये, लाइव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दर्शनरांग, दर्शनमंडप, मंदिर व मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे.