जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन

जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन

------------------------------------------------------------------------------------

सोलापूर, (दै.पंढरी नगरी न्यूज ) राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र मुंबई यांच्या निर्देशानुसार नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली.

या समितीचा उद्देश निवडणूक कालावधीत प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या राजकीय जाहिरातींची तपासणी, प्रमाणीकरण आणि संनियंत्रण करणे हा आहे. जिल्हा माहिती अधिकारी हे समितीचे सदस्य सचिव तथा नोडल अधिकारी म्हणून कार्य करतील.

समितीमध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे:

- जिल्हा पोलीस अधीक्षक, सोलापूर  

- निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर  

- संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी  

- संबंधित नगरपरिषद / नगरपंचायतचे मुख्याधिकारी  

ही समिती मीडिया मॉनिटरिंग कमिटी (MCMC) म्हणून कार्य करणार असून, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया आणि इतर डिजिटल माध्यमांवरील राजकीय जाहिरातींचे परीक्षण व प्रमाणीकरण करणार आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींना आवाहन करण्यात येते की, प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व जाहिराती या समितीकडून प्रमाणित करूनच प्रसारित कराव्यात, जेणेकरून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि कायद्याच्या चौकटीत राहील.